चाकणमध्ये थरार; अपघाताची नुकसान भरपाई न दिल्याने दोघा भावांवर गोळीबार

0
3491

चाकण, दि. २३ (पीसीबी) – अपघात झालेल्या कारची नुकसान भरपाई न दिल्याने एकाने दोन जणांवर गोळीबार करुन त्यांना जीवेमारण्याचा प्रयत्न केला. ही थरारक घटना शुक्रवारी (दि.२१) रात्री सव्वाअकराच्या सुमारास चाकण पोलीस ठाणे हद्दीतील आंबेठाण गाव येथे घडली.

या घटनेत शांताराम दत्तात्रय चव्हाण (वय ३३, रा. आंबेठाण गाव, चाकण) आणि त्यांचा चुलत भाऊ गणेश चव्हाण हे दोघे जखमी झाले. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार, निलेश उर्फ जग्गुभाई नवनाथ मांडेकर (वय २८, रा. आंबेठाण गाव, चाकण) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास चाकण पोलीस ठाणे हद्दीतील आंबेठाण गाव येथे जखमी शांताराम चव्हाण यांचा मावस भाऊ शांताराम गाडे, चुलत भाऊ गणेश चव्हाण आणि त्याचा मित्र राजु मोहिते यांच्याकडील कार (क्र. एमएच/१४/एफएण/९१५९) आणि आरोपी शांताराम दत्तात्रय चव्हाण यांच्याजवळील कार (क्र.एमएच/१४/६०३४) या दोन कारमध्ये अपघात झाला. अपघातात कारचे झालेल नुकसान भरुन द्याव म्हणून शांताराम गाडे, गणेश चव्हाण मित्र राजु मोहिते यांचे आरोपी निलेश उर्फ जग्गुभाई नवनाथ मांडेकर याच्यासोबत भांडण सुरु झाले. यावेळी निलेशने गणेश चव्हाण याच्यावर पिस्तुलातून गोळी झाडली मात्र शांताराम यांनी मध्ये हात घालून गणेशला वाचवले. यावर निलेशने पुन्हा शांताराम यांच्यावर गोळी झाडली. तसेच त्यांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करुन जीवेमारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने कोणालाही गोळी लागली नाही. याप्रकरणी निलेश उर्फ जग्गुभाई नवनाथ मांडेकर याला अटक करण्यात आली आहे. चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत.