चाकणमध्ये घरात लपवलेल्या गावठी पिस्टलसह सराईताला अटक

0
600

चाकण, दि. ३ (पीसीबी) – घरातील किचनच्या पोटमाळ्यावर लपवलेली एक गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसांसह एका सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई चाकण पोलिसांनी रविवारी (दि.२) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास मेदनकरवाडी मार्तंडनगर येथे केली.

संदिप अरुण शिंदे (वय ४२, रा. मेदनकरवाडी, मार्तंडनगर) असे पिस्टलसह अटक करण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विक्रम पासलकर यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. त्यानुसार, संदिप विरोधात आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदिप हा सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. चाकण पोलिसांना माहिती मिळाली होती कि, संदीपने घरात पिस्टल लपवून ठेवली आहे. यावर चाकण पोलिसांनी रविवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास संदिप याच्या घरावर धाड टाकली. पोलिसांनी त्याच्या घरातील किचनची झडती घेतली असता किचनच्या पोटमाळ्यावर २५ हजार ४०० रुपये किमतीची एक गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुस आढळून आले. पोलिसांनी ते जप्त करुन आरोपी संदिपला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक जगदाळे अधिक तपास करत आहेत.