चाकणमध्ये कारमधील तिघा चोरट्यांनी दाम्पत्याला लुटले; ९८ हजारांचे ऐवज केला लंपास

0
728

चाकण, दि. २ (पीसीबी) – चाकणकडे जाण्यासाठी गाडीची वाट पाहत बसलेल्या एका दाम्पत्याला चाकणला सोडतो असे सांगून तिघा चोरट्यांनी कारमध्ये बसवले तसेच निजर्न स्थळी नेत अंगावरील दागिने, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण ९८ हजार १०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला. ही घटना बुधवार (दि.३१ ऑक्टोबर) सकाळी दहाच्या सुमारास महाळुंगे ते नानेकरवाडी गावच्या हद्दीतील हायवे रोडवर घडली.

याप्रकरणी मुकेश गोविंद राठोड (वय २४, रा. खालुंब्रे) यांनी चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, पांढऱ्या रंगाच्या इंडिका (कार. क्र.५७५२) कारमधील तीन अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश आणि त्यांची पत्नी बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास महाळुंगे येथून चाकणकडे जाण्यासाठी रस्त्यावर वाहनाची वाट पाहत बसले होते. यावेळी तळेगावच्या दिशेने आलेल्या इंडिका कार (क्र. ५७५२) यातील तिघाजणांनी तुम्हा चाकणला सोडतो चला असे सांगितले. यावर मुकेश आणि त्यांची पत्नी त्यांच्या कारमध्ये बसले. मात्र आरोपींनी कार नानेकरवाडी शिवारजवळील निजर्न स्थळी नेऊन मुकेश यांना कारच्या सीटखाली दाबून त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याची पोत, गंठण, बोरमाळ, झुंबरजोड वेल आणि मायक्रोमॅक्स कंपनीचा मोबाईल असा एकूण ९८ हजार १०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला. चाकण पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.