चाकणमधील एचपी पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना अटक; तिघे फरार; दोन लाखांचा ऐवज जप्त  

0
1095

चाकण, दि. १३ (पीसीबी) – वासुली गावाच्या हद्दीतील एचपी कंपनीच्या पेट्रोलपंपावर दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोघा जणांना चाकण पोलिसांनी अटक केली आहे. यातील इतर तीन आरोपी फरार झाले असून आरोपींकडून कारसह एकूण २ लाख ८ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि.११) रात्री दहाच्या सुमारास चाकण येथील वासुली गावाच्या हद्दीतील एचपी पेट्रोलपंपावर घडली.

वैभव बापु राऊत (वय २०, रा. चिखली सोनवणे वस्ती रोड, विद्या भालसिंगे यांच्या खोलीत, मुळ रा. निजाम जवळा, उस्मानाबाद), अविनाश प्रकाश शिंदे (वय २४, रा. सोनवणेवस्ती रोड, मोरे यांच्या खोलीत, मुळ रा. मातमळ जि. बुलढाणा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर बारक्या उर्फ विकास अजय गायकवाड (रा. महादेवनगर, चिखली), लखण गव्हाणे (रा. सोनवणेवस्ती रोड, विश्वकल्याण शाळेजवळ, चिखली) आणि सागर भालेराव (रा. देहुरोड) असे फरार झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी या पाच ही आरोपींविरोधात चाकण पोलिस ठाण्यात दरोड्याचा प्रयत्न केल्या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री दहाच्या सुमारास चाकण पोलिस चाकण पोलिस ठाणे हद्दीत गस्तीवर असता त्यांना वासुली गावाच्या हद्दीतील एचपी पेट्रोलपंपावर दरोड्याच्या तयारीत असलेल्या आरोपींची माहिती मिळाली. यावर पोलिसांनी तातडीने तेथे जावून आरोपी वैभव आणि अविनाश या दोघांना अटक केली. मात्र त्यांचे साथीदार विकास, लखण आणि सागर हे तिघे ही फरार झाले. पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली एक कार, कोयता, सुरा, मोबाईल, दारुच्या बाटल्या असा एकूण २ लाख ८ हजार ४५० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. तर इतर तीन आरोपींचा पोलिस शोध घेत आहे.