सत्ता सोडली, तर “मातोश्री’ची चूल पेटणार नाही – नारायण राणे 

0
1006

 सावंतवाडी, दि. १३ (पीसीबी) –  सत्ता सोडली तर “मातोश्री’ची चूल पेटणार नाही. त्यामुळे शिवसेना सत्तेतून  बाहेर पडण्याची भाषा करत असली, तरी कधीही सत्तेला लाथ मारणार नाही. कारण सत्ता हाच शिवसेनेचा प्राणवायू आहे,’ असे टीकास्त्र  स्वाभिमान’ पक्षाचे अध्यक्ष व खासदार नारायण राणे यांनी शिवसेनेवर सोडले.

वैभववाडीतील अर्जुन रावराणे विद्यालयाच्या मैदानात  स्वाभिमान पक्षाची जाहीर सभा आयोजित केली होती. यावेळी राणे बोलत होते.

राणे म्हणाले की, गेली ४० वर्ष राज्याच्या राजकारणात सक्रीय  असल्याने सर्वच  पक्षांचे राजकारण जवळून पाहिले आहे. पण कोणताही पक्ष दीनदुबळ्यांच्या, जनसामान्यांच्या हिताचे राजकारण करत नसल्याचे आपले ठाम मत झाले आहे. त्यामुळेच जनतेच्या हिताचा विचार करणारा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय  घेतला. त्यामुळे जात, धर्म विसरून कोकणी  लोकांनी  स्वाभिमान पक्षाच्या पाठीशी राहावे, असे  ते म्हणाले.

यावेळी राणे यांनी शिवसेना-भाजपवरही तोंडसुख घेतले.  शिवसेनेवर टीका करताना ते म्हणाले की, ३९ वर्ष जीवाची पर्वा न करता बाळासाहेबांवरील निष्ठेपायी  लढत राहिलो. मराठी माणसांकरिता शिवसेना  आहे, असे भासविले जात आहे. मात्र,  मराठी माणसासाठी त्यांनी काय केले? शिवसेनेने धंदेवाईक राजकारण सुरू केल्याचा आरोपही राणे यांनी यावेळी केला.