चांदणी चौकात कॅशियरच्या डोळ्यादेखत दोन हजारांच्या १८ नोट चोरट्याने केल्या लंपास

0
443

चिंचवड, दि. २ (पीसीबी) – दोन हजार रुपयांच्या नोटांच्या बंडल मधून ७८६ या अनोख्या क्रमांकाची नोट काडून घेण्याच्या बहाण्याने एका चोरट्याने वर्कशॉप मधील कॅशियरच्या डोळ्यादेखत दोन हजारांच्या १८ नोट लंपास केल्याचे समोर आला आहे. ही घटना सोमवारी (दि. १) चांदणी चौकाजवळ टोयोटा वर्कशॉपमध्ये घडला.

विशाल प्रकाश भालगरे (वय २१, रा. विघ्नहर्ता सोसायटी, आंबेगाव पठार, पुणे. मूळ रा. केंजळ, ता. भोर) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल चांदणी चौकाजवळ असलेल्या टोयोटा कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये कॅशियर म्हणून काम करतात. सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास एक अनोळखी इसम वर्कशॉपमध्ये आला. त्याने विशाल यांच्याकडे दोन हजार रुपयांची दुसरी नोट मागितली. त्यावेळी विशाल यांनी एक दोन हजारांच्या नोटांचा बंडल बाहेर काढला. आरोपीने नोटांचा बंडल हातामध्ये घेऊन बंडल मधून ७८६ नंबर असलेली नोट मी काढून घेतो, असे सांगून नोटा पाहू लागला. नोटा बघत असताना आरोपीने दोन हजार रुपयांच्या तब्बल १८ नोटा असे एकूण ३६ हजार रुपये चोरुन सर्व्हिस सेंटरच्या बाहेर निघून गेला. नोटा पुन्हा मोजल्यानंतर विशाल यांना त्यातील दोन हजारांच्या १८ नोटा गायब झाल्याचे लक्षात आले. मात्र तोवर आरोपी तेथून निघून गेला होता. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक डी. एन. निकम तपास करत आहेत.