चंद्राबाबू सत्तास्थापनेसाठी मोट बांधत नसून राजकीय स्मशानातील ‘राख’ गोळा करीत आहेत – शिवसेना

0
451

मुंबई, दि. २० (पीसीबी) – सातव्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर रविवारी प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोलमध्ये  एनडीए पुन्हा एकदा  सत्तेवर विराजमान होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी भाजपविरोधी पक्षांची मोट बांधण्यास सुरूवात केली आहे. यावर  शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून  चंद्राबाबू आणि विरोधकांवर  निशाणा साधला आहे.

विरोधी पक्षांची एक मोट बांधण्याचा प्रयत्न चंद्राबाबू नायडू करीत आहेत. चंद्राबाबू दिल्लीत आले. त्यांनी शरद पवार, राहुल गांधी यांच्या भेटी घेतल्या. तिथून ते लखनौला गेले. मायावती, अखिलेश यादवना भेटले. द्रमुकच्या स्टॅलिन महाशयांनाही ते भेटले. देवेगौडा यांच्या जनता दलाचा एक तुकडा काँग्रेसबरोबर आहे, पण कर्नाटकात स्वतः देवेगौडा हे पराभवाच्या छायेत आहेत.

अरविंद केजरीवाल यांच्या ‘आप’ला दिल्ली, पंजाब किंवा हरयाणात एकही खासदार निवडून आणता येणार नाही. प. बंगालात डाव्यांना खातेही खोलता येणे शक्य नाही. केरळात त्यांच्या जागा घसरत आहेत. त्यामुळे चंद्राबाबू सत्तास्थापनेसाठी मोट बांधत नसून राजकीय स्मशानातील ‘राख’ गोळा करीत आहेत,  अशा शब्दांत  सामनामधून तोफ डागण्यात  आली आहे.

आंध्रात चंद्राबाबू यांचा तेलुगू देसम पक्ष चांगली लढत देत असला तरी आंध्रात वायएसआर काँग्रेसच्या जगनभाईंचा जोर आहे व चंद्राबाबू-जगन यांच्यातून विस्तव जात नाही. बाजूच्या तेलंगणातही काँग्रेस, तेलुगू देसमच्या तुलनेत के. सी. चंद्रशेखर राव यांच्या पक्षाला मोठी आघाडी मिळत आहे आणि तिथेही चंद्रशेखर व चंद्राबाबू यांच्या नात्याला तडे गेले आहेत.

दिल्लीत येण्याआधी चंद्राबाबूंनी जगन व चंद्रशेखर यांच्याबरोबर स्नेहभोजन केल्याची छायाचित्रे प्रसिद्ध केली असती तर त्यांच्या दिल्लीतील हालचालींना बळ मिळाले असते, पण चंद्राबाबू यांनी दिल्लीत जाऊन शरद पवारांची दोनवेळा भेट घेतली व त्यांना आंब्याची पेटी भेट दिली. चर्चा करायला हरकत नाही, पण ही ‘मोट’ २३ तारखेच्या संध्याकाळपर्यंत कोणत्या खडकावर आपटून फुटेल याची खात्री नाही,  असा  टोला  अग्रलेखात  लगावला आहे.

महाराष्ट्रासह संपूर्ण देश दुष्काळाशी झुंजतो आहे व मान्सूनची प्रतीक्षा करतो आहे हे खरे, पण २३ तारखेला दिल्लीचे वारे बदलणार काय यावर पैजा लागल्या आहेत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केदारनाथमधील एका गुहेत भगव्या वस्त्रात तपस्येला बसल्याची छायाचित्रे विरोधकांची मने विचलित करीत आहेत. ‘विरोधकांचा फाजील सेक्युलरवाद विरुद्ध मोदी यांचा हिंदुत्ववाद’ असा हा सामना आहे. शेवटी भाजपास व मित्रपक्षांना विजयप्राप्तीसाठी हिंदुत्वाचाच आधार घ्यावा लागला, हा  हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेचा विजय आहे,  असे अग्रलेखात  म्हटले आहे.