चंद्रकांतदादा दिसेल त्याला भाजपमध्ये येण्याचे आमंत्रण देत आहेत – जयंत पाटील

0
697

सांगली, दि. ९ (पीसीबी) – राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे दिसेल त्याला भाजपमध्ये प्रवेश करण्याचे आमंत्रण देत आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केली. सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी येथे  एका कार्यक्रमात ते बोलत होते. 

सांगली जिल्ह्यातील वाळवा येथील एका कार्यक्रमात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हुतात्मा उद्योग समूहाचे वैभव नायकवडी यांना भाजपमध्ये येण्याचे आवाहन केले होते. यावर जयंत पाटील यांनी महसूलमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. पाटील म्हणले की,  चंद्रकांतदादांनी कोणाला तरी पक्षात येण्याचे आमंत्रण दिल्याचे समजत आहे.  दादा दिसेल, त्याला पक्षात बोलवित असतात, असा टोला त्यांनी लगावला.

यावेळी जयंत पाटील यांनी शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या  वादंगावर दोन्ही पक्षावर हल्ला चढवला.   ज्या पक्षाने २०-२५ वर्षे साथ दिली, त्या शिवसेनेला भाजप अध्यक्ष अमित शहा उखडून टाकण्याची भाषा करत आहेत. आज बाळासाहेब ठाकरे हयात असते, तर भाजप सरकारचा पाठींबा काढून घेतला असता. त्यांचे वारस असा स्वाभिमान दाखविणार का? असा सवाल करून पाटील यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले.