चंद्रकांतदादांच्या गावातच भाजपच्या ‘हाता’वर ‘घड्याळ’, शिवसेनेविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादीशी युती

0
235

कोल्हापूर, दि. 5 (पीसीबी) : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या गावातच काँग्रेस-राष्ट्रवादीशी भाजपने हातमिळवणी केली. शिवसेनेला शह देण्यासाठी तिन्ही पक्षाचे स्थानिक नेते एकत्र आले. कोल्हापुरातील खानापूर ग्रामपंचायतीसाठी झालेल्या या अनोख्या आघाडीची राज्यभर चर्चा सुरु झाली आहे.

चंद्रकांतदादा पाटील यांच्या खानापूर गावात सध्या भाजपची सत्ता आहे. मात्र शिवसेनेचा मेरु रोखण्यासाठी भाजपने चक्क ‘हाता’वर ‘घड्याळ’ बांधले. भुदरगड तालुक्यातील खानापूर ग्रामपंचायतीसाठी भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांचे स्थानिक नेते एकत्र आले.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असतानाही खानापूरमध्ये ही अनोखी युती झाली आहे. स्थानिक पातळीवर का असेना, पण शिवसेनेविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी यांनी शड्डू ठोकत चक्क भाजपशी आघाडी केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

आबिटकर गटाला रोखण्याचं आव्हान
वारंवार होणाऱ्या आरोपांमुळे चंद्रकांत पाटलांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. खानापूर गावात आबिटकर गटाला रोखण्यासाठी भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ घेतली आहे.
प्रकाश आबिटकर हे कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार आहेत. सत्ता खेचून आणण्यासाठी आबिटकरांनी कंबर कसली आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी रंगतदार निवडणूक पाहायला मिळणार आहे.