घरपोच दारु सुसाट

0
318

मुंबई, दि. ३० (पीसीबी) : महाराष्ट्रात लॉकडाऊनमध्येही दारुची विक्री सुसाटपणे सुरु आहे. राज्यात गेल्या 15 मेपासून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री करण्यात येत आहे. त्यानुसार 15 मे 2020 ते 29 मे 2020 या काळात 5 लाख 52 हजार 637 ग्राहकांना घरपोच दारुविक्री करण्यात आली. तर आज दिवसभरात 58 हजार 231 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री करण्यात आली. कोरोनाच्या दोन महिन्याच्या काळातील कमतरता जवळपास भरून निघाली.

यात मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात 35 हजार 513 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली. राज्यात दारुविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर राज्यात एकूण 10 हजार 791 किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्तीपैकी 7,291 अनुज्ञप्ती सुरु आहेत.
राज्य शासनाने 3 मेपासून लॉकडाऊन कालावधीत सीलबंद मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहे. राज्यात 15 मे पासून घरपोच मद्यविक्री योजना अंमलात आली. त्यानुसार ग्राहकांना घरपोच मद्यविक्री करण्यात येत आहे.

लाखाहून अधिक ग्राहकांचे मद्य परवान्यासाठी अर्ज
राज्य उत्पादन शुल्क विभागाने तयार केलेल्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन मद्यसेवन परवाना प्राप्त करण्याची सुविधा उपलब्ध आहे. यात 1 मे ते 28 मे या काळात 1 लाख 14 हजार 224 ग्राहकांनी मद्यसेवन परवाने मिळवण्यासाठी अर्ज केले होते. यापैकी 1 लाख 02 हजार 712 ग्राहकांना परवाने मंजूर करण्यात आले आहे.

ऑनलाईन मद्यसेवन परवाना घेताना येत असलेल्या सर्व तांत्रिक अडचणींची सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार आता इच्छूक व्यक्ती संगणक, लॅपटॉप, अँड्रॉइड फोन, तसेच IOS प्रणालीव्दारे ऑनलाईन परवाने घेऊ शकतात.

तसेच कोणाला ऑनलाईन परवाना घ्यायचा नसेल तर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व अधीक्षक/निरीक्षक/दुय्यम निरीक्षकांच्या कार्यालयात दररोज मद्यसेवन परवाने ऑफलाईन पध्दतीने सुध्दा उपलब्ध आहेत.

या मद्यसेवन परवान्यासाठी एक वर्षाकरीता 100 रुपये किंवा आजीवन परवान्याकरीता 1 हजार रुपये शुल्क भरावे लागतात.