गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची ‘रॉ’मार्फत चौकशी करा – धनंजय मुंडे

0
457

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची आणि भारतातील निवडणुकांची केंद्रीय गुप्तचर यंत्रणे ( रॉ )मार्फत चौकशी  करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते व  विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू झाला, तेव्हाच तो अपघात नसून घातपात असावा, अशी शंका मुंडेप्रेमी प्रत्येकाने केली होती.  

गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबाबत सय्यद शुजा या आंतरराष्ट्रीय सायबर तज्ज्ञाने केलेल्या  गौप्यस्फोटांमुळे  त्यांच्या मृत्यूबाबतच्या  शंकेला  पुष्टी मिळाली आहे. हे धक्कादायक  आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले.   एका मोठ्या नेत्याचा मृत्यू आणि सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशातील निवडणुकांशी संबंधित हे प्रकरण आहे. त्यामुळे याची ‘रॉ’मार्फत किंवा सर्वाच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मार्फत चौकशी  करणे गरजेचे असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे.

लंडनमध्ये  घेतलेल्या पत्रकार परिषदेत सय्यद शुजा या हॅकरने  गंभीर आरोप करून  खळबळ उडवून दिली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन) हॅक करण्याचे तंत्र आपल्याकडून आत्मसात केल्याचे त्यांने  म्हटले आहे. त्यामुळेच  लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला मोठा विजय मिळवता आल्याचे  हॅकरने म्हटले आहे.