गैरहजर माजी नगरसेवकांची नावे पाठवून द्या; दुसऱ्यांदा प्रदेशाध्यक्ष झालोय, पक्षसंघटना काय असते ते दाखवून देतो – जयंत पाटील

0
215

पिंपरी दि. २६ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळेवाडी येथे झालेल्या सभासद नोंदणी आढावा बैठकीला बहुतांश माजी नगरसेवकांनी दांडी मारल्याने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा पारा चडला. मी दुसऱ्यांदा प्रदेशाध्यक्ष झालो आहे. पक्षसंघटना काय असते ते दाखवून देतो असे सुनावत गैरहजर माजी नगरसेवकांची नावे पाठवून देण्याची सूचना शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांना केली.

सभासद नोंदणी आढावा बैठकीत बोलताना पाटील म्हणाले, नगरसेवक हे जनतेशी जोडलेले असतात. त्यांचा नागरिक, जनतेशी सर्वाधिक संबंध येतो. त्यामुळे त्यांना सभासद नोंदणी करणे सहज शक्य होते. ज्यांना आगामी महापालिका निवडणूक लढवायची आहे. त्यांनी अधिका अधिक सभासद नोंदणी करणे गरजेचे आहे. क्रियाशील 300 सदस्य करणाऱ्यांना महापालिका निवडणुकीसाठी पक्षाचे तिकीट दिले जाईल. केंद्रात, राज्यात सत्ता नाही मग आता पक्षाच्या बैठकीला कशाला जायचे असे ज्यांना वाटते. त्यांनी गेलेली सत्ता कधीही येवू शकते. टाईम कधीही बदलू शकतो हे लक्षात ठेवावा असा सज्जड इशाराही त्यांनी दिला.

जनमत शिंदे गट आणि भाजपच्या विरोधात गेले आहे. त्यामुळेच ते महापालिका निवडणुका घेण्यास घाबरत आहेत. ऐनकेन प्रकारे निवडणुका पुढे ढकलण्याची खेळी खेळत आहेत. महापालिका निवडणुकीत प्रभाग दोन, तीन अथवा चारचा होवो. जनता पाठीशी असल्यावर कशाला घाबरण्याची गरज नाही. महापालिकेतील तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या कामगिरीवर, त्यांचे कामकाज पाहून निवडणुका होतात. ही काय लोकसभा, विधानसभेची निवडणूक नाही. राज्यात सत्ता असताना अनेक नगरसेवक संपर्कात होते. पण, आता सत्ता बदल झाली आहे. त्यामुळे पक्षात येणाऱ्यांचा ओग कमी झाला आहे. पण, निवडणूक जाहीर होताच आमच्या पक्षात येणाऱ्या नगरसेवकांचे प्रमाण वाढेल. पिंपरी-चिंचवडसह अनेक महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येईल असा दावाही त्यांनी केला.

महापालिका निवडणुकीकरिता राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना अशी आघाडी व्हावी अशी आमची भूमिका आहे. शिवसेना, काँग्रेस सोबत निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आमचे प्राधान्य आहे. स्थानिक पातळीवर आघाडी करण्यासंदर्भात सर्वाधिकार दिले आहेत, असेही त्यांनी सांगितले.