गृह विलगीकरणातील कोरोना बाधीत रूग्णांना महापालिका दररोज फोनद्वारे संपर्क साधणार

0
256

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह रूग्णांवर संस्थात्मक विलगीकरण केंद्र व घरगुती विलगीकरणात उपचार सुरू आहेत. या रूग्णांची दिवसातून एक वेळा दुरध्वनी करून औषधोपचाराची माहिती घेण्यासाठी कॉल सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. हे कॉल सेंटर चालविणा-या संस्थेला प्रति कॉलसाठी 13 रूपये देण्यात येणार आहेत.  याबाबतच्या आयत्यावेळच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली.

पिंपरी – चिंचवड महापालिका हद्दीत कोरोनाचा नवीन विषाणू असलेल्या ‘ओमायक्रॉन’चा संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या वाढत आहे. तिसरी लाट सदृश्य स्थिती झाल्याचे दिसून येत आहे. कोरोना बाधीत झालेल्या रूग्णांवर महापालिका आणि खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. तसेच कोरोनाचा प्रादूर्भाव झालेल्या परंतु त्याबाबत साधारण अथवा कोणतीही लक्षणे नसलेल्या रूग्णांवर संस्थात्मक विलगीकरण केंद्र व घरगुती विलगीकरणात उपचार सुरू आहेत.

कोरोनाच्या दुस-या टप्प्यात घरगुती विलगीकरण केलेल्या रूग्णांचे शरीराचे तापमान, हृदयाची गती, झोपेची गुणवत्ता, खोकला, अंगदुखी, श्वास घेण्यास अडचण अशा प्रकारची माहिती संबंधित रूग्णांना रोजच्या रोज दिवसातून एक वेळा दुरध्वनी करून उपलब्ध करून घेतली जात होती. ही सर्व माहिती रूग्णांना दुरध्वनी करून प्राप्त करून घेणे तसेच पुढील उपचाराकरिता मदत पुरविण्यासाठी ऑरनेट टेकनोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेमार्फत 29 एप्रिल 2021 ते 28 जुलै 2021 या कालावधीत कॉल सेंटर स्थापन करण्यात आले होते.

या माहितीनुसार महापालिका रूग्णालय किंवा कोरोना केअर सेंटर मार्फत रूग्णांवर उपचार करणे शक्य होत होते. या कॉल सेंटरद्वारे रूग्णांना दिवसातून एक वेळा दुरध्वनी करून त्याची आरोग्य विषयक माहिती घेतली जात होती. रूग्णांना आवश्यक ते उपचार अथवा रूग्णालयात दाखल करण्याकरिता मदत करण्यात येत होती. या एका दुरध्वनी कॉल करिता ऑरनेट टेकनोलॉजीज यांना प्रति कॉल 13 रूपये याप्रमाणे दर निश्चित करण्यात आला होता. कॉल सेंटरचे कामकाज पुन्हा सुरू केले आहे. 8 जानेवारी 2022 पासून दोन महिने कालावधीकरिता हे कॉल सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. प्रति कॉल येणारा खर्च 13 रूपये याप्रमाणे प्रत्यक्ष होणा-या कॉलनुसार खर्च होणार आहे.