उप आयुक्त आशादेवी दुरगुडे होणार पहिल्या महिला सह आयुक्त

0
321

पिंपरी, दि. १३ (पीसीबी)- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उप आयुक्त आशादेवी दुरगुडे या सह आयुक्त होणार आहेत. दुरगुडे यांना सह आयुक्त होण्याचा बहुमान मिळणार आहे. तर, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत यांना सह शहर अभियंता (स्थापत्य) या पदावर बढती देण्यात येणार आहे.

पालिका आस्थापनेवर सह आयुक्त पद शासन मंजूर असून पदोन्नतीसाठी रिक्त आहे. सह आयुक्त हे पद पदोन्नतीने भरण्यासाठी आयुक्त राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पदोन्नती समितीची 10 ऑक्टोबर 2021 रोजी बैठक झाली. उप आयुक्त पदावरील अधिका-यांची शैक्षणिक अर्हता, अनुभव कालावधी, सेवाज्येष्ठता, गोपनीय अहवाल, मत्ता व दायित्व, संगणक अर्हता आणि शिस्तंभग विषयक कारवाईचा तपशील पडताळला. त्यानुसार उप आयुक्त आशादेवी दुरगुडे यांनी सह आयुक्त पदावर बढती देण्यास पदोन्नती समितीने मान्यता दिली.

दुरगुडे यांना सह आयुक्तपदी बढती देण्याच्या प्रस्तावाला 7 जानेवारी 2022 रोजी विधी समितीनेही मान्यता दिली. सर्वोच्च न्यायालयातील न्यायप्रविष्ठ असलेल्या याचिकेमध्ये होणा-या अंतिम निर्णयाच्या  व शासन निर्णयाच्या अधिन राहून सेवाज्येष्ठतेनुसार रिक्त जागेवर पदोन्नती देण्यात येणार आहे.  तर, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत यांना सह शहर अभियंता (स्थापत्य) या पदावर बढती देण्यात येणार आहे. पदोन्नती समितीने लडकत यांना सह शहर अभियंता पदावर बढती देण्याची शिफारस केली असून हा प्रस्तावही मान्यतेसाठी महासभेसमोर ठेवला आहे.