गुजरातमधील गांधीनगर महानगरपालिका निवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय

0
308

अहमदाबाद, दि. ५ (पीसीबी) – गुजरातमधील गांधीनगर महानगरपालिका निवडणुकीत भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे. तर, काँग्रेस व आम आदमी पार्टीला मात्र मोठ्या अपयशाला सामोरं जावं लागलं आहे. या निवडणुकीत भाजपाने ४४ पैकी ४१ जागांवर विजय मिळवत निर्विवादपणे आपलं वर्चस्व सिद्ध केलं. तर, काँग्रेसच्या वाट्याला केवळ दोन जागा आल्या आणि आम आदमी पार्टीला केवळ एका जागेवरच समाधान मानावं लागंलं.
या महापालिका निवडणुकीत ११ वॉर्डामधील ४४ जागांसाठी एकूण १६२ उमेदवार रिंगणात होते. महापौरपद हे अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. तर, एससी प्रवर्गाच्या सर्व पाच जागांवर भाजपाने विजय मिळवलेला आहे. महापालिका निवडणुकीचे मतदाना रविवारी पार पडले. त्यानंतर आज (मंगळवार) मतमोजणी झाली.
या निवडणुकीत आम आदमी पार्टीने देखील उमेदवार उभे केल्याने, येथील लढत ही त्रिशंकू पाहायला मिळाली. आम आदमी पार्टीने ४० जागांवर उमेदवार उभा केले होते. तर, अन्य उमेदवारांमध्ये बसपाचे १४, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन, अन्य पक्षांचे सहा आणि अपक्ष ११ उमेदवारांचा समावेश होता. जवळपास ५६.२४ टक्के मतदान झाले होते.
मनपा निवडणुकीत भाजपाला दणदणीत विजय मिळाल्यानंतर, पक्षाकडून जनतेचे आभार व्यक्त करण्यात आले. भाजपा प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांनी म्हटले की ४४ पैकी ४१ जागांवर भाजपाला जनतेने विजयी केलं आहे. यावरून हे दिसून येते की लोकांचा पंतप्रधान मोदींवर विश्वास आहे. तसेच, या निवडणुकीतून हे देखील स्पष्ट झाले की, गुजरातमध्ये तिसऱ्या पक्षासासाठी काही स्थान नाही.