गाडीची चावी न दिल्याच्या रागातून उच्चशिक्षित तरुणाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

0
702

भोपाळ, दि. ५ (पीसीबी) – वडिलांनी गाडीची चावी देण्यास नकार दिल्याच्या रागातून एका उच्चशिक्षित तरुणाने दारुच्या नशेत स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि.३) भोपाळच्या अवधपुरीमध्ये घडली.

शैलेंद्र सिंह सोनखिया (वय २७, रा. अवधपूरी, भोपाळ) असे मृत तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमबीए पदवीधर असलेला शैलेंद्र बेरोजगार होता. शैलेंद्रचा १ एप्रिल रोजी वाढदिवस होता. पण आजोबा आजारी असल्यामुळे त्याला वाढदिवस साजरा करता आला नाही. शैलेंद्रचे आई-वडिल भूपेंद्र आणि गीता सिंह उत्तर प्रदेश ललितपूरमध्ये सरकारी शिक्षक आहेत. घटनेच्या दिवशी शैलेंद्रला त्याच्या मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी जायचे होते. शैलेंद्रची दारु पिण्याची सवय त्याच्या आई-वडिलांना माहित होती. यामुळे अपघाताच्या भितीने दारु पिल्यानंतर ते त्याला गाडी देत नव्हते. बुधवारी शैलेंद्र दारु पिऊन घरी आला आणि गाडीची चावी मागितली. पण वडिलांनी त्याला चावी देण्यास नकार दिला. त्यावरुन घरात मोठा वाद झाला. शैलेंद्रने टीव्ही आणि घरातील सोफा सेट तोडून टाकला. त्यानंतर तो घरातून निघून गेला आणि दहा मिनिटांनी परत आला.

तो घरी आल्यानंतर एक ग्लास पाणी प्यायला व आपल्या रुममध्ये निघून गेला. शैलेंद्र सामन्य झाला आहे असे त्याच्या कुटुंबियांना वाटले. पाच मिनिटांनी शैलेंद्रच्या रुममधून गोळी चालवण्याचा आवाज आला. कुटुंबिय त्याच्या खोलीच्या दिशेने धावले पण त्याने आतून रुम बंद केली होती. कुटुंबियांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा शैलेंद्र खाली पडलेला होता. त्याला लगेच रुग्णालयात नेले पण डॉक्टरांनी तपासल्यानंतर मृत घोषित केले.