गणेश मूर्तींचे हौदातच विसर्जन करा; महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकरांचे पिंपरीतील वैभवनगरमध्ये आवाहन

0
705

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – वसुंधरेच्या रक्षणासाठी सर्व नागरिकांनी आपले सण, उत्सव पर्यावरणपूरक पध्दतीने साजरे करावेत. मांगल्याचे प्रतिक असणारा गणेशोत्सव देखील शहरात मोठ्या भक्ती भावाने, उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होत आहे. शहराच्या जीवनवाहिन्या असणाऱ्या इंद्रायणी आणि पवना नदीचे पावित्र्य राखण्यासाठी व या नद्या प्रदूषित होण्यापासून रोखण्यासाठी पिंपरीतील वैभवनगरमध्ये उभारण्यात आलेल्या कृत्रिम हौदातच गणेश मूर्तींचे विसर्जन करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले.

पिंपरीतील आसवाणी असोशिएटस्‌ आणि ॲस्पीफ्लाय इनव्हायरमेंट या संस्थेतर्फे गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी पिंपरीगावातील वैभवनगर येथे लहान, मोठ्या आकाराचे एकूण चार हौद उभारण्यात आले आहेत.

याचा गणपती मंडळांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पिंपरी – चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले. त्याचे उद्‌घाटन आयुक्त हर्डीकर यांच्या हस्ते सोमवारी (दि. १७) करण्यात आले. तसेच आयुक्त हर्डीकर यांच्या हस्ते या हौदात गणेश मूर्तीचे वसर्जन करण्यात आले. यावेळी माजी आमदार अण्णा बनसोडे, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा व भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका सीमा सावळे, भाजपचे शहर सरचिटणीस सारंग कामतेकर, नगरसेवक शीतल शिंदे, डब्बू आसवाणी, उद्योजक राजू आसवाणी, श्रीचंद आसवाणी, विजय आसवाणी, सुरेश जुम्माणी, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, माजी नगरसेविका माधुरी मूलचंदाणी, महापालिकेचे सह आयुक्त दिलीप गावडे, जयहिंद हायस्कूलच्या मुख्याध्यापिका ज्योतिका मलकाणी आदी उपस्थित होते.

या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल विजय आसवाणी म्हणाले, “पिंपरीतील वैभवनगर येथे एकूण चार हौद उभारण्यात आले आहेत. आठ फूट, नऊ फूट, बारा फूट आणि सोळा फूट खोलीचे हे हौद आहेत. परिसरातील गणेश मंडळांनी तसेच घरगुती गणपतींच्या मूर्तींचे या हौदातच विसर्जन करावे यासाठी जयहिंद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तपणे घरोघरी जाऊन, सोसायट्यांमधील मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना भेटून आवाहन व प्रबोधन केले. त्यामुळे पहिल्याच दिवशी पिंपरीगाव, काळेवाडी, तापकीरनगर भागातील छोट्या मोठ्या मंडळांनी, सोसायटीतील मंडळांनी आणि घरगुती एकूण २५६५ गणेश मूर्तींचे या चार होदांमध्ये विसर्जन करण्यात आले. अनंत चतुर्दशीपर्यंत म्हणजे रविवारपर्यंत ही सुविधा मोफत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. विसर्जनाच्या वेळी श्रींच्या आरतीसाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. महापालिकेच्या वतीने पाणी व निर्माल्यकुंड उपलब्ध करून देण्यात आले आहे. संयोजकांच्या वतीने विद्युत व्यवस्था व स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच चार खासगी अनुभवी जीवरक्षक नेमण्यात आले आहेत. जीवरक्षक विधीवत पध्दतीने या हौदांमध्ये मूर्ती विसर्जन करतील. या उपक्रमाचे हे पहिलेच वर्ष असून, सार्वजनिक गणेश मंडळांचा व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.”