गणेश मंडळांच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांना आवर घाला – अजित पवार

0
667

पुणे, दि. २० (पीसीबी) – मुंबईतील लालबागचा राजा या गणपतीच्या  दर्शन मंडपात मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून पोलीस अधिकारी आणि नागरिकांना धक्काबुकी झाल्याची घटना समोर आली आहे, असे प्रकार रोखण्यासाठी अतिउत्साही कार्यकर्त्यांना आवर घालावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज (गुरूवार) येथे केली.

अजित पवार यांनी आज पुण्यात केसरीवाडा येथील मानाच्या गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले की, अंधश्रद्धांना खतपाणी घालणाऱ्या संभाजी भिडे वा कुणी मौलवींवरही कारवाई झाली पाहिजे. राज्यात ६५ हजार कोटी खर्च होऊन देखील सिंचन प्रकल्पाची टक्केवारी वाढलेली नाही. आमचे सरकार असताना हजारो कोटी कसे खर्च झाले, अशी विचारणा करणाऱ्या सत्ताधारी पक्षाने आता सिंचन प्रकल्पाची माहिती द्यावी, असेही पवार म्हणाले.

राज्यातील सरकारच्या पोकळ आकडेवारी, नोटबंदी, इंधन दरवाढ आणि महागाईमुळे जनता हैराण झाली आहे. ही जनताच आगामी निवडणुकीत सरकारला त्यांची जागा दाखवून देईल, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.