गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या; पुण्यासह राज्यभरात विसर्जन मिरवणुकांना सुरूवात

557

पुणे, दि. २३ (पीसीबी) – दहा दिवस पूजा केल्यानंतर अकराव्या दिवशी आज (रविवार) विघ्नहर्त्या बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. त्यासाठी आज राज्यभरात ढोलताशांचा दणदणाट, गुलाल व भंडाराची उधळणीचा प्रचंड उत्साह आहे. गणरायाला निरोप देण्यासाठी पुण्या, मुंबईसह संपूर्ण राज्यात विसर्जन मिरवणुकांना सुरवात झाली आहे. पुण्याचा पहिला मानाचा गणपती कसबा गणपतीच्या मिरवणुकीलाही सुरूवात झाली आहे. “गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या”, अशी विनवणी करत बाप्पाला निरोप देण्यात येत आहे.

डीजेवर बंदी असल्याने पुण्यासह राज्यभरात पारंपारिक वाद्याच्या गजरात बाप्पाच्या मिरवणुका निघाल्या असून त्यामुळे राज्यातील कानाकोपऱ्यातील रस्ते फुलून गेले आहेत. आज सकाळीच मुंबईतील गणेश गल्लीच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. तर पुण्यात सकाळी साडेदहा वाजता विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली. मिरवणुकी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून संपूर्ण राज्यभरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून मिरवणुकांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे वॉच ठेवण्यात आला आहे.