चाकणमध्ये शेतकऱ्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने माजी लष्करी सैनिकाविरोधात गुन्हा

0
1054

चाकण, दि. २ (पीसीबी) – गावात वारंवार बदनामी करुन आणि मानसिक त्रास देऊन एका शेतकऱ्याला अत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने माजी लष्करी सैनिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी (दि.१) सायंकाळी सहाच्या सुमारास चाकण पोलीस ठाणे हद्दीतील बहुळ गावातील कुंदखटी नावाच्या शेतात त्या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

दत्तात्रय लक्ष्मण खलाटे (वय ३९, रा. बहुळ ता. खेड) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा भाऊ संभाजी लक्ष्मण खालटे (वय ४३, रा. बहुळ ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, फौजी उर्फ शक्ती उर्फ बापु महादेव साबळे आणि इतर चौघा जणांविरोधात आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत शेतकरी दत्तात्रय खलाटे यांनी वर्षभरापूर्वीच आरोपी फौजी उर्फ शक्ती याच्याकडून साडेचार गुंठे जागा विकत घेतली होती. मात्र ती जागा शक्ती हा पुन्हा दत्तात्रय यांच्याकडे मागत होता. पण दत्तात्रय ती जागा विकायला तयार नव्हते. यातून शक्ती आणि गावीतील चौघा जणांनी दत्तात्रय यांची गावात बदनामी करण्यास सुरुवात केली. आणि त्यांना मानसिक त्रास दिला. या तनावातून दत्तात्रय यांनी शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास चाकण पोलीस ठाणे हद्दीतील बहुळ गावातील कुंदखटी नावाच्या शेतात जाऊन गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी फौजी उर्फ शक्ती उर्फ बापु महादेव साबळे आणि इतर चौघा जणांविरोधात आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. सहायक पोलीस निरीक्षक उध्दव खाडे तपास करत आहेत.