खलिस्तानी दहशतवादी नेत्याच्या पुतण्याचा संशयास्पद मृत्यू…! ISI शी होते खास संबंध

0
142

विदेश,दि.०७(पीसीबी) – खलिस्तानी चळवळीचा नेता जर्नेल सिंग भिंद्रनवालेचा पुतण्या लखबीर सिंग रोडे याचा २ डिसेंबर रोजी पाकिस्तानात मृत्यू झाला आहे. सुत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. रोडे याला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय. शीख प्रथा आणि परंपरांचे पालन करून रोडेवर गुप्तपणे पाकिस्तानात अंत्यसंस्कार करण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले. लखबीर सिंग रोडे पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI च्या सांगण्यावरून पंजाबमध्ये भारताविरुद्धच्या दहशतवादी कारवायांमध्ये सामील होता. ऑक्टोबरमध्ये, राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दहशतवादविरोधी एजन्सीने छापे टाकल्यानंतर रोडेची मालमत्ता जप्त केली होती.

पंजाबमधील मोगा येथे छापे टाकण्यात आले. २०२१ ते २०२३ दरम्यान दहशतवादाशी संबंधित कारवायांमध्ये सक्रिय सहभागासाठी रोडेविरोधात सहा प्रकरणांची चौकशी करत असताना दहशतवादविरोधी एजन्सीची कारवाई झाली. रोडे हा बंदी घातलेल्या आंतरराष्ट्रीय शीख युथ फेडरेशनचा (ISYF) प्रमुख होता आणि त्याला सरकारने दहशतवादी म्हणून घोषित केले होते.

दरम्यान, “आम्हाला माझा भाऊ लखबीर सिंग रोडे यांच्या मुलाने कळवले की त्याचा पाकिस्तानमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आणि तिथेच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याला मधुमेहाचा जास्त त्रास होता. त्याची दोन मुले, एक मुलगी आणि पत्नी कॅनडामध्ये राहतात”, अशी माहिती लखबीर सिंग याचा भाऊ जसबीर सिंग यांनी एका वृत्तवाहिनीला दिली.

मूळचा मोगा येथील रोडे गावचा रहिवासी असलेला लखबीर सिंग सुरुवातीला दुबईला पळून गेला होता. नंतर तो पाकिस्तानात गेला पण त्याच्या कुटुंबाला कॅनडामध्ये ठेवले. २००२ मध्ये भारताने पाकिस्तानकडे २० दहशतवाद्यांची यादी सादर केली होती आणि त्यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती.