‘खड्डे बुजवावे, पदपथावरील अतिक्रमण हटवा’ – निगडी ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयास बैठकीत महापौर माई ढोरे यांचे आदेश

0
456

पिंपरी दि.०७ (पीसीबी) – नागरिकांच्या कररुपी पैशातुन महापालिका आपला कारभार हाकत आहे. या पैशाचा विनियोग योग्य पध्दतीने करुन नागरिकांना उत्तम सुविधा देण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजवावे. कामात टाळाटाळ करणे, जाणीवपूर्वक विलंब करणे अथवा दुर्लक्ष करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याशिवाय गत्यंतर नाही असा इशारा महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिला. अधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयात बसून काम न करता फील्डवर जाऊन प्रत्यक्ष कामातील अडचणी दूर करुन कामांना गती द्यावी असेही त्या म्हणाल्या.

महापालिकेच्या निगडी येथील अ क्षेत्रीय कार्यालयास आज महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी भेट देऊन या कार्यक्षेत्रातील कामे तसेच विविध उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेतली. बैठकीस अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसदस्या अनुराधा गोरखे, मीनल यादव, नगरसदस्य तुषार हिंगे, केशव घोळवे, प्रमोद कुटे, अमित गावडे, शितल शिंदे, स्वीकृत सदस्य राजेंद्र कांबळे, सुनिल कदम, अ क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, कार्यकारी अभियंता रविंद्र पवार, अनिल शिंदे, संजय खाबडे, आकुर्डी रुग्णालयाच्या ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजाता साळवे, सहाय्यक आरोग्य अधिकारी एम. एस. शिंदे आदींसह स्थापत्य, विद्युत, स्थापत्य क्रीडा, पाणीपुरवठा, स्थापत्य उद्यान, झोनिपु स्थापत्य, आरोग्य, जलनि:सारण, अतिक्रमण आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

प्रभाग स्तरावर चाललेली कामे, येथील समस्या, प्रश्न तसेच हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पांची सद्यस्थिती, पावसाळी कामे, कोरोना विषयक नियोजन, अतिक्रमण अशा विविध विषयांवर बैठकीत चर्चा झाली. जीर्ण तसेच अडथळा ठरणा-या वृक्षांची छाटणी, विद्युत तारांवर तसेच धोकादायक ठरणा-या झाडांच्या फांद्यांची छाटणी, हॉकर्सचे अतिक्रमण आणि व्यवस्थापन, पाणी पुरवठा नियोजन याबाबत नगरसदस्यांनी विविध मुद्दे मांडले. नाल्यांची कामे तातडीने करावी, रस्त्यावरील खड्डे बुजवावे, पदपथावरील अतिक्रमण हटवावे, पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करण्यात यावा, शाहूनगरमधील क्रीडांगणाच्या सीमाभींतीचे काम पूर्ण करावे, तुटलेले पदपथ दुरुस्त करावे, पाणीपुरवठ्याबाबत महापालिका आणि एमआयडीसी यामध्ये समन्वय ठेवावा, विद्यानगर भागातील अतिक्रमण काढावे, नाल्यावर होणारे बांधकाम रोखावे, लसीकरण केंद्रावरील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने नियोजन करावे, सुलभ शौचालयांची स्वच्छता ठेवावी, आकुर्डी भाजी मंडई जवळील राडारोडा उचलावा, अपूर्ण प्रकल्पांच्या कामाला गती द्यावी, लिंकरोड भागातील अतिक्रमण हटवावे आदी सूचना त्यांनी मांडल्या.

बैठकीत आलेल्या सूचना आणि मुद्दयांबाबत महापौर माई ढोरे यांनी संबंधित अधिका-यांना सूचना दिल्या. महापौर ढोरे म्हणाल्या, लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या तक्रारींना महत्व देऊन त्यांचा तातडीने निपटारा करणे गरजेचे आहे. साफसफाई ही शहराच्या सदृढ आरोग्यासाठी महत्वाची आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने काळजीपूर्वक याकडे लक्ष द्यावे. कर्मचा-यांनी प्रामाणिकपणे आपले काम करावे. वारंवार तक्रारी येणे ही बाब चांगली नाही. आपण नागरिकांच्या सेवेसाठी आहोत याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी. महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागल्यास अशा गोष्टी अजिबात सहन केल्या जाणार नाहीत. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. अनधिकृत टप-यांवर तातडीने कारवाई करावी असे आदेश महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी यावेळी दिले.

प्रभाग स्तरावरील कोविड केअर सेंटर, फिव्हर क्लिनिक, कोविड चाचणी केंद्र याबद्दल डॉ. सुजाता साळवे यांनी बैठकीत माहिती दिली. तसेच लसीकरण केंद्रावरील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची विनंतीही त्यांनी यावेळी केली.