क्विन्स टाऊन सोसायटीत दोघे कोरोना पॉझिटिव्ह – सोसायटीतील इमारत सील करायला विरोध

0
510

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचे रुग्ण रोज १०० च्या पटीत वाढत आहेत. झोपडपट्यांपासून हाऊसिंग सोसायट्या, टॉवर्स, चाळींसह सर्वत्र कोरोनाचे रुग्ण आहेत. आज दोन हजारावर रुग्ण आहेत. अशाही परिस्थितीत वारंवार सुचना करूनही लोक नियम पाळत नाहीत. अलिशान हाऊसिंग सोसायटीमध्ये रुग्ण आढळला तर त्या सोसायटी पदाधिकाऱ्यांनी सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे. उलटपक्षी इमारत सील करायला गेलेल्या अधिकाऱ्यांना पिटाळून लावले जाते. चिंचवड रेल्वे स्टेशन समोरील उच्चभ्रूंची वसाहत असलेल्या क्विन्स टाऊन या हाऊसिंग सोसायटीतील एका इमारतीमधील दोघांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. प्रशानाच्या आदेशानुसार ती इमारत सील करायला अधिकारी गेले तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विरोध करून अक्षरशः पिटाळून लावले, असे सांगण्यात आले.

क्विन्स टाऊन्स ही ७२५ अलिशान सदनिकांची शहरातील मोठी सोसायटी आहे. सोसायटीच्या सदस्यांनी इमारत सील केली पाहिजे अशी भूमिका घेतली होती. मात्र, इमारत सील करायला आलेल्या कर्मचाऱ्यांना पदाधिकाऱ्यांनी विरोध केला. अखेर केवळ एक परिपत्रक चिटकविण्यात आले. सोसायटीतील जाणकार सदस्यांनी या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली आणि महापालिका आयुक्त यांच्याकडे तक्रार केली, असे सांगण्यात आले.

शहरात कुठेही रुग्ण आढळला की तो परिसर १४ दिवसांसाठी सील केला जातो. चिंचवड स्टेशन येथील आनंदनगर झोपडपट्टी गेले महिनाभर सर्व बाजुंनी सील केलेली आहे. त्याच पध्दतीने रोज आढावा घेऊन जिथे पॉझिटिव्ह केस मिळेल तो परिसर अथवा इमारत सील केली जाते. झोपडपट्टीत विरोध केला तर पोलिस बळाचा वापर करून तो परिसर सील केला जातो, मात्र क्विन्स टाऊन सारख्या सुशिक्षित नागरिकांना मुभा दिली जाते, अशी परिसरातील नागरिकांची तक्रार आहे.