कोस्टल रोडचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन; भाजपचा बहिष्कार

0
448

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवाद सुरू असलेल्या महत्त्वाकांक्षी  कोस्टल रोडचे आज (रविवार)  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण नव्हते. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशामुळे भाजपच्या इतर नेत्यांनीदेखील या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.

ब्रीच कॅन्डी येथील अमरसन्स गार्डन येथे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कोस्टल रोडच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, खासदार अरविंद सावंत आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर उपस्थित होते.

भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे भाजप आमदार मंगलप्रभात लोढा,  भाजप गटनेते मनोज कोटक, प्रभाग समिती अध्यक्ष अतुल शाह, स्थानिक नगरसेविका सरिता पाटील यांना निमंत्रण देण्यात आले होते. परंतु पक्षातील वरिष्ठांनी या कार्यक्रमाला कोणीही न जाण्याचे आदेश दिल्याने ते या कार्यक्रमासाठी उपस्थित नव्हते, असे सांगितले जात आहे. पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्याचे उद्धव ठाकरे याना आमंत्रण दिले नसल्याने शिवसेनेने कोस्टल रोडच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमामधून भाजपला डावलून वचपा काढल्याचे बोलले जात आहे.