कोविड सेंटरमध्ये बेवड्याचा प्रताप

0
300

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – तुम्ही आमचा पेशंटवर व्यवस्थित उपचार करत नाहीत’ म्हणत एक व्यक्ती दारूच्या बाटल्या घेऊन कोविड सेंटरमध्ये आला. त्याने कोविड सेंटरमधील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून औषधे खाली पाडली. दरम्यान नागरिकांनी पोलिसांना बोलावले. पोलीस आल्याचे दिसताच गोंधळ घालणारा व्यक्ती शिव्या देत पळून गेला. ही घटना 30 एप्रिल रोजी रात्री म्हाळुंगे येथील म्हाडा कोविड सेंटर मध्ये घडली.

वैभव बाळासाहेब तापकीर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाळुंगे येथे म्हाडा कोविड सेंटर आहे. 30 एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता आरोपी दारूच्या बाटल्या घेऊन सेंटरमध्ये आला. ‘तुम्ही आमच्या पेशंटवर व्यवस्थित उपचार करीत नाही’ असे म्हणून आरोपीने फिर्यादी आणि कोविड सेंटर मधील अन्य स्टाफला शिवीगाळ व दमदाटी केली. ओपीडी मध्ये येऊन टेबलवर ठेवलेले रजिस्टर आणि औषधे खाली पाडून त्यांचे नुकसान केले. आरोपीने सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याबाबत नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी येताच आरोपी शिवीगाळ करत तिथून पळून गेला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.