कोल्हापुरात कडकनाथ कोंबडी घोटाळ्याचा पहिला बळी, तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

0
319

कोल्हापूर, दि.२१ (पीसीबी) – राज्यातील वादग्रस्त ठरलेल्या रयत ऍग्रो संस्थेकडे अडीच लाख रुपयांची गुंतवणूक केल्याने नैराश आलेल्या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

प्रमोद जमदाडे  असे या आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.

 मिळालेल्या माहितीनुसार, २५ वर्षीय तरूण पन्हाळा तालुक्यातील माले या गावचा रहिवासी आहे. प्रमोद जमदाडे या २५ वर्षीय तरुणाने रयत ऍग्रोच्या कडकनाथ कोंबडी प्रकल्पामध्ये गुंतवणूक केली होती. अल्पकाळात मोठा लाभ मिळणार अशी जाहिरात केल्याने तो भुलला होता. त्यातून कर्ज काढून त्यांनी प्रकल्पात गुंतवणूक केली होती. सुमारे अडीच लाख रुपयांची गुंतवणूक त्यांनी केली होती. ती त्याच्या आर्थिक कुवतीपेक्षा अधिक होती. कर्जाचे हफ्ते थकीत राहिल्याने हप्त्याचा ससेमिरा सुरु होता, असे सांगण्यात आले. प्रकल्पात फसवणूक केली झाल्याने त्याने १८ तारखेला विषारी औषध प्राशन केले होते. गुंतवणुकीमध्ये अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाल्याने रयतचा प्रमुख सागर सदाभाऊ खोत याची तातडीने चौकशी व्हावी अशी मागणी आज कोल्हापुरात जमदाडे यांच्या आत्महत्येनंतर अनेक गुंतवणूकदारांनी केली. त्यांच्याकडून या सर्व प्रकाराबद्दल संताप व्यक्त होत होता. कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्यावर उपचार सुरू असताना आज त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूचे वृत्त कळताच रयत मध्ये गुंतवणूक केलेले अनेक गुंतवणूकदार तसेच नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले. गुंतवणूकदारांनी रयत प्रमुख माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे सुपुत्र सागर यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती.