कोल्हापुरातील जमाव बंदी आदेश मागे

0
992

कोल्हापूर, दि. १३ (पीसीबी) – कोल्हापूर जिल्ह्यात १२ ते २४ ऑगस्टपर्यंत  लागू करण्यात आलेला  जमाव बंदीचा आदेश मागे घेण्यात आला आहे.  पूरस्थिती नियंत्रणात येत आहे. मदतकार्याला वेग येत असताना जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आली होती. यावर सर्व स्तरातून टीका होऊ लागली होती. नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. या पार्श्वभूमीवर हा आदेश मागे घेण्यात येत असल्याचे अपर जिल्हा दंडाधिकारी संजय शिंदे यांनी सांगितले.

पूरपरिस्थितीत  जिल्ह्यात काही अनुचित घटना घडल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता आहे. यामुळे अपर जिल्हा दंडाधिकारी संजय शिंदे यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम, १९५१ चे कलम ३७(१) अ ते फ आणि कलम ३७ (३) अन्वये कोल्हापूर जिल्ह्यात १२ ते २४ ऑगस्टला रात्री १२ वाजेपर्यंत  जमाव बंदी आदेश जारी केला होता.

बकरी ईद, १५ ऑगस्ट, दहीहंडी सण  साजरे होणार आहेत. तसेच  आत्महत्या, आमरण उपोषण, ठिय्या आंदोलन, पक्ष संघटनांकडून त्यांच्या विविध मागण्यांसाठी वारंवार होणारी आंदोलने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरात जमाव  बंदीचे आदेश जारी करण्यात आले होते.