‘कोरोना प्रतिबंधक उपचारासाठी मागणीनुसार पुरवठा सुरळीत होईल’ : खा.डॉ.अमोल कोल्हे यांचे आश्वासन

0
228

– आरोग्य अधिकारी व डॉक्टरांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साधला संवाद

पुणे, दि.२१ (पीसीबी) : कोरोना प्रतिबंधक उपचार करताना ग्रामीण भागात रेमडिसिवीर, ऑक्सिजन, व्हेटिंलेटर बेडची उपलब्धता व अन्य समस्यांच्या सोडवणुकीसाठी मागणी वाढत आहे. त्यानुसार रेमडिसिवीर, ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यासाठी पाठपुरावा सुरू असून लवकरच त्याची पूर्तता होईल, असा विश्वास शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.

कोरोना प्रतिबंधक उपचार या विषयावर मुंबईतील केईएम हॉस्पिटल कोविड आयसीयूचे इनचार्ज व नेस्को कोविड सेंटरचे डीन डॉ. संतोष सलागरे यांनी जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर व हवेली तालुक्याचे आरोग्य अधिकारी, शासकीय व खासगी रुग्णालयांचे डॉक्टर व पत्रकारांशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. तांत्रिक अडचणीमुळे डॉ. सलागरे यांना पूर्णवेळ संवाद साधता आला नाही. त्यामुळे हा वेबिनार पुन्हा आयोजित केला जाणार आहे.

डॉ. सलागरे यांची तांत्रिक अडचण दूर करण्याचे प्रयत्न सुरू असताना दरम्यानच्या काळात ग्रामीण भागात रेमडिसिवीर, ऑक्सिजन, व्हेटिंलेटर बेडची उपलब्धता व अन्य समस्यांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी डॉ. कोल्हे यांनी अजिबात न अडखळता उपस्थित डॉक्टरांच्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली. त्यामुळे उपस्थित डॉक्टर वर्गाने वेबिनार आयोजित केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या वेबिनारमध्ये विविध रुग्णालय, डीसीएचसीचे ८५ पेक्षा जास्त डॉक्टर उपस्थित होते.

या संदर्भात खा. कोल्हे म्हणाले की, ग्रामीण भागातही रेमडिसीवीरची मागणी वाढली आहे. परंतु पुरवठा कमी असल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे उपचार करताना रेमडिसीवीर ऐवजी फॅव्हीपॅरावीर या पर्यायी औषधांचा वापर केला तर फायदा होईल. अत्यावश्यक असेल तरच रेमडिसीवीरचा वापर करावा असे आवाहन केले. त्याचबरोबर प्लाझ्मा थेरेपी संदर्भात अधिक माहिती देताना डॉ. कोल्हे यांनी सांगितले की, प्लाझ्मा थेरेपीच्या राज्य सरकारच्या क्लिनीकल ट्रायल्स बंद झाल्या आहेत. तरीही काही हॉस्पिटल्स व डॉक्टरांकडून प्लाझ्माचा आग्रह धरला धरतो. त्यामुळे रेमडिसिवीर आणि प्लाझ्मा मिळविण्यासाठी नातेवाईकांची धावपळ होते. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेडच्या पूर्ततेसाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तसेच आवश्यक मनुष्यबळ उपलब्धतेसाठी देखील पाठपुरावा सुरू आहे. औद्योगिक वापरासाठीचा राखीव ऑक्सिजन साठा वैद्यकीय उपचारासाठी वळविण्यात आला आहे. तरीही तुटवडा निर्माण झाला आहे. त्यावर उपाय म्हणून तातडीने ऑक्सिजन निर्मिती कंपन्यांशी संपर्क साधून औंध येथील जिल्हा निर्मिती प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. सीएसआर निधीतून औद्योगिक क्षेत्रातच प्रकल्प सुरू करता येईल का याची चाचपणी जिल्हा प्रशासनाकडून सुरू असल्याचे खा. कोल्हे यांनीबरोबर उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात सीएसआर निधीतून ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असे सांगितले. तसेच एखाद्या रुग्णालयाला स्वतःसाठी ऑक्सिजन प्लांट उभारायचा असेल तर असे प्लांट उभारणाऱ्या कंपन्यांशी समन्वय साधून देण्याची तयारी दर्शवली.

या ऑनलाइन मिटींगला जुन्नर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश गोडे, आंबेगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकले, खेड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गाढवे, शिरूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोरे व हवेली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात, डॉ. अजय पंडित, डॉ. भगवान काकणे, डॉ. इंदिरा पारखे, डॉ. राजेंद्र मोहिते, डॉ. किरण जाधव, डॉ. भूषण साळी, डॉ. प्रशांत दौंडकर, डॉ. चेतन कर्डिले यांच्यासह विविध शासकीय व खासगी रुग्णालयांचे डॉक्टर व पत्रकार उपस्थित होते.