कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांनी घेतली आयुक्तांची भेट

0
266

पिंपरी,दि.12 (पीसीबी): पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. ही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सोमवारपासून लॉकडाऊन जाहीर केला आहे. शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ अजित पवार यांनी शनिवारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कोरोना वॉररूमला भेट दिली.

महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासोबत यावेळी त्यांनी चर्चा करून शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. याशिवाय महापालिकेच्या प्राथमिक शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या प्रश्नाबाबत चर्चा केली. सदर प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू, अशी खात्री आयुक्तांनी दिल्याचे पार्थ पवार यांनी सांगितले. प्रशासनाला विविध सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या वेळी, डी.वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या विश्वस्तांशी देखील भेट झाली. डी.वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि यशवंतराव चव्हाण मेमोरिअल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने कोव्हिड रुग्णांसोबतच नॉन-कोव्हिड रुग्णांसाठी वॉर्ड उभारुन शहरातील नॉन-कोव्हिड रुग्णांच्या उपचारांसाठी महत्त्वाची सोय केली आहे. यासाठी डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे त्यांनी आभार मानले आहेत.