शाळेतून पुस्तके गणवेश खरेदी करण्याची सक्ती केल्यास गुन्हे दाखल करा- बच्चू कडू यांचे निर्देश

0
314

अकोला ,दि.12 (पीसीबी): शाळेतून पुस्तके गणवेश खरेदी करण्याची सक्ती केल्यास गुन्हे दाखल करा, असे निर्देश अकोल्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.

खाजगी शिक्षण संस्था चालकांना त्यांच्याच शाळेतून विद्यार्थ्यांसाठी लागणारी वह्या पुस्तके, गणवेश इ. साहित्य खरेदीची पालकांना सक्ती करता येत नाही. तशी त्यांनी केल्यास त्यांच्यावर शिक्षणाधिकाऱ्यांनी तात्काळ संबंधित संस्थाचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करावे, असे निर्देश उर्फ बच्चू कडू यांनी दिले. यासंदर्भात अकोला येथे पालकांचे शिष्टमंडळ श्री.कडू यांना भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी पालकांनी तक्रारीचे निवेदन देऊन संस्थाचालकांकडून विद्यार्थ्यांना लागणारी वह्या पुस्तके, शालेय गणवेश व अन्य साहित्य खरेदी करण्यासाठी शाळांकडूनच किंवा शाळेने नेमून दिलेल्या विक्रेत्याकडूनच खरेदी करण्याची सक्ती केली जाते, याबद्दल आपली व्यथा मांडली

दरम्यान संबंधित पालकांना आश्वस्त करताना श्री. कडू म्हणाले, शिक्षण संस्थाचालक अशाप्रकारे सक्ती करु शकत नाही. तसा त्यांना अधिकार नाही. आपल्या पाल्यासाठी आवश्यक शालेय साहित्य, वह्या पुस्तके, प्रयोग वही इ. तसेच अन्य साहित्य हवे तेथून घेऊ शकतात. पालकांनी संस्थाचालकांविरुद्ध संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी. अशी तक्रार आल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत असे निर्देश श्री. कडू यांनी दिले.