कोरेगांव भीमामध्ये विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी अनुयायींची गर्दी  

0
976

पुणे, दि. १ (पीसीबी) – कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यासह देशभरातील नागरिक  आज (मंगळवार) गावात  दाखल झाले आहेत.  विविध संस्था, संघटना आणि आंबेडकरी अनुयायींनी विजयस्तंभाला अभिवादन  करण्यासाठी गर्दी केली आहे. गतवर्षीपेक्षा यंदा विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे.   

गेल्या वर्षीच्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर यावर्षी  पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने विशेष सज्जता ठेवली आहे. छुपे कॅमेरे, सीसीटीव्ही, ड्रोन यांच्या साहाय्याने परिसरावर नजर ठेवली आहे. दरम्यान, भारिप बहुजन महासंघाचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी  आज सकाळी विजय स्तंभाला अभिवादन केले. अद्यापपर्यंत दंगल घडवणाऱ्यांवर सरकारकडून कारवाई केलेली नाही. त्यामुळे समाजात तेढ निर्माण कसा होईल आणि दंगली कशा घडतील. हेच सरकार पाहत आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

यंदा परिसरात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला आहे. ५ हजार पोलीस कर्मचारी, १२ राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या, घातपातविरोधी सात चमू, बाराशे होमगार्ड, दोन हजार स्वयंसेवक, आठ सहाय्यक पोलीस अधीक्षक, ३१ जिल्हा पोलीस उपअधीक्षक, १२६ पोलीस निरीक्षक, ३६० सहायक पोलीस निरीक्षक असा कडेकोट बंदोबस्त तैनात  करण्यात आला आहे.  ४० व्हिडिओ कॅमेरे, ३०६ सीसीटीव्ही, बारा ड्रोन, ५० दुर्बिणी, पोलिसांच्या हेल्मेटमधील आणि छुप्या ५० कॅमेऱ्यांद्वारे  परिसरावर बारीक  नजर ठेवण्यात आली आहे.

दरम्यान, १ जानेवारी १८१८ रोजी पेशवे आणि ब्रिटिशांमध्ये लढाई झाली होती. या लढाईत  महार बटालियनने महत्त्वाची  कामगिरी केली होती. त्यांनी पेशव्यांच्या सैन्याचा पराभव केला होता. या लढाईला यंदा २०१ वर्षे पूर्ण झाली. या विजयाचे प्रतीक म्हणून कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभ उभारण्यात आला आहे.