ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचे कॅनडातील रुग्णालयात निधन

0
989

कॅनडा, दि. १ (पीसीबी) – ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचे कॅनडातील रुग्णालयात आज पहाटेच्या सुमारास निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती प्रचंड खालावली होती. ते ८१ वर्षांचे होते. काही दिवसांपासून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.

मिळालेल्या माहितीनुसार,  कादर खान यांना श्वास घेताना त्रास होत असल्याने कॅनडातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कादर खान यांना वेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. कॅनडामध्येच कादर खान यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

कादर खान यांनी १९७३ मध्ये ‘दाग’ चित्रपटातून अभिनयात पदार्पण केले.  ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. नाटकापासून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या कादर खान यांनी अनेक चित्रपटांसाठी संवादलेखनदेखील केले. २५० पेक्षा जास्त चित्रपटांचे संवाद लेखन त्यांनी केले. त्यांची लेखणी आणि अभिनय वेगळेच रसायन होते. करिअरच्या सुरुवातीला व्हिलनचे पात्र साकारण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या कादर खान यांनी हिंमतवाला चित्रपटापासून कॉमेडी भूमिकांकडे आपले लक्ष्य केंद्रीत केले होते.