कोथरुडमध्ये पाण्याच्या टाकी पडून ४ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

0
411

पुणे, दि. १८ (पीसीबी) – बांधकामाच्या साईटवर बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीत पडून एका ४ वर्षीय चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.१७) सायंकाळच्या सुमारास कोथरुड येथील शास्त्रीनगर परिसरात सुरु असलेल्या बांधकाम साईटवर घडली.

पिनाक सत्यवान तोंडे (वय ४) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरुड परिसरातील शास्त्रीनगर भागात एका नव्या इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या ठिकाणी बांधकामासाठी लागणारे पाणी जमा करता यावे म्हणून पाण्याची टाकी देखील बांधण्यात आली आहे. रविवारी सायंकाळी या ठिकाणी ४ वर्षी पिनाक आपल्या काही मित्रांसोबत खेळत होता. खेळता खेळता तो अचानक गायब झाला. नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला असता तो पाण्याच्या टाकीत आढळून आला. त्याला तातडीने टाकी बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, पाण्याची टाकी उघडी ठेवल्याने पिनाकचा मृत्यू झाला असून सबंधित बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. कोथरुड पोलीस तपास करत आहेत.