कोकणात शिक्षण, आरोग्य, पर्यटन, रोजगार यासाठी विकास कामे करणार – आ. योगेश कदम

0
509
पिंपरी, दि.२१ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरात स्थायिक झालेल्या कोकणवासीयांच्या कोकण विकास महासंघ या संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या हस्ते आ. योगेश कदम यांचा मानपत्र, शाल, श्रीफळ, पुणेरी पगडी आणि तलवार देऊन भव्य नागरी सत्कार गुरुवारी (दि.२०) पिंपरी काळेवाडी येथे करण्यात आला. यावेळी आ. कदम बोलत होते.
निसर्गसंपन्न कोकण परिसर रोजगार आणि शिक्षणामुळे मागे आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी काळात आपण कोकणातील शिक्षण, आरोग्य, पर्यटन यावर लक्ष केंद्रीत करुन विकास कामे करणार आहोत. त्यामुळे कोकणात लाखों नवीन रोजगार निर्माण होतील आणि कोकणच्या भूमीपुत्रांना उद्योग व्यवसायासाठी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये जावे लागणार नाही. असे प्रतिपादन दापोली – खेड – मंडणगडचे आमदार योगेश रामदास कदम यांनी केले.
कदम म्हणाले की, पिंपरी चिंचवड व पुण्यामध्ये स्थायिक झालेल्या कोकणवासीयांच्या भरघोस मतांमुळेच मी कोकणातील सर्वात युवा आमदार म्हणून निवडून आलो. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे मुळ गाव माझ्या मतदार संघात आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा, हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आशिर्वाद, शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मला राजकारणात प्रवेश करण्याची संधी मिळाली. कोकणातील पाच तालुक्यात अद्यापपर्यंत रक्त पेढी नाही. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने लवकरच खेडमध्ये रक्त पेढी व पन्नास बेडच्या रुग्णालयाचे शंभर बेडमध्ये विस्तारिकरण करण्यात येणार आहे. कोकणात चाळीस टक्के पाऊस होतो. परंतू सिंचन अवघे एक टक्का आहे. या भागात कोल्हापूर पध्दतीने साखळी बंधारे बांधण्याचे नियोजन आहे. नुकतेच एका बंधा-याचे भूमिपूजन झाले असून मे महिन्यापर्यंत काम पूर्ण होईल आणि पुढच्या पावसाळ्यात येथे पाणी आडविले जाईल. त्यामुळे अठरा गावांचा पाण्याचा कायमस्वरुपी प्रश्न मिटेल. माजी मंत्री रामदासभाई कदम यांनी शिवतेज संस्थेच्या माध्यमातून उभारलेल्या मिलीटरी स्कूल, डेन्टल कॉलेज मुळे शैक्षणिक सुविधा मिळत आहेत. त्याचा विस्तार करणार आहोत. पर्यावरण पुरक प्रकल्पांबरोबरच पणन महामंडळाच्या योजना कोकणात सुरु करुन साडे आठशे कोटींचा शीतगृह प्रकल्प सुरु होणार आहे. त्यामुळे कोकणातील भाजीपाला, शेती उत्पादने परदेशात विकता येतील. यातून तीन हजारांहून जास्त महिलांना व युवकांना रोजगार मिळेल असे आ. कदम यांनी सांगितले.
नगरसेवक सद्‌गुरु कदम म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरामध्ये बहुउद्देशीय कोकण भवन उभारण्याचा कोकण महासंघाचा मानस आहे. त्यासाठी आ. योगेश कदम यांनी शासनाकडून जागा उपलब्ध करुन द्यावी.
यावेळी संस्थेच्या वतीने लेफ्टनंट सौरभ संजय उत्तेकर, डॉ. प्रेरणा सद्‌गुरु कदम, प्रेरणा विजय साळवी, डॉ. आदित्य मनमोहन जाधव, डॉ. दिपक मोरे, डॉ. सोनाली धोंडिराम जाधव, विशाल विजय पवार, निकिता तुकाराम परबते, मंदार शिवाजी शिंदे, रुपेश कदम, श्रावणी मनोज पवार, आयुष नाचरे, सोहम सुरेश मोरे, अनुजा राजेंद्र पवार, सुर्यकांत पवार, सागर उत्तेकर, अक्षय मोरे यांना ‘कोकण रत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. स्वागत प्रास्ताविक करताना माजी कार्यक्रमाच्या संयोजनात कॅप्टन श्रीपत कदम, संजय मोरे, अवधूत कदम, रुपेश कदम, विजय निकम, प्रदिप सपकाळ, गजानन मोरे, राहूल ढेबे आदींनी सहभाग घेतला. आभार अशोक कदम यांनी मानले.
व्यासपीठावर पुणे मनपाच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, पिंपरी चिंचवड मनपाच्या स्थायी समिती माजी अध्यक्षा ममता गायकवाड, रत्नागिरी जिल्हा परिषद बांधकाम समिती सभापती अरुण अण्णा कदम, नगरसेविका सुजता पालांडे, खेड तालुका पंचायत समिती उपसभापती विजय कदम, पुणे मनपा शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ, माजी नगरसेविका निर्मला कदम, विजया सुतार, माजी नगरसेवक सद्‌गुरु कदम, विनायक गायकवाड, प्रमोद ताम्हणकर, सामाजिक कार्यकर्ते विजय सुतार, कामगार नेते नयन पलांडे, कॅप्टन श्रीपत कदम, एकनाथ कदम, अवधुत कदम आदींसह बहुसंख्य कोकणवासी उपस्थित होते.