केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारकडून दिवाळी भेट; महागाई भत्त्यात पाच टक्के वाढ

0
409

नवी दिल्ली, दि.९ (पीसीबी) – दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पाच टक्के घसघशीत वाढ केली असून मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. १ जुलैपासून ही वाढ लागू करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

केंद्रीय मंत्रिमडळाची बुधवारी बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याबरोबरच इतरही निर्णय घेण्यात आले. केंद्रीय प्रसारण आणि माहिती मंत्री प्रकाश जावडेकर यांनी निर्णयाची माहिती दिली. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची चांगली भेट दिली आहे. सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ करण्याचा निर्णयाला बैठकीत मंजूरी दिली. या निर्णयामुळे ५० लाख वेतनधारक कर्मचारी आणि ६२ पेन्शनधारकाना लाभ होणार आहे. यामुळे १६ हजार कोटी रूपयांचा बोजा सरकारी तिजोरीवर पडणार असून, चालू आर्थिक वर्षाच्या १ जुलैपासून हा निर्णय लागू करण्यात येणार असल्याचे जावडेकर म्हणाले. आतापर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांना १२ टक्के भत्ता दिला जात होता. त्यात पाच टक्के वाढ करण्यात आल्यामुळे भत्ता १७ टक्के झाला आहे, असेही जावडेकर म्हणाले.