छगन भुजबळांना धक्का; येवल्यात राष्ट्रवादीच्या नेत्याचा शिवसेनेला पाठिंबा

0
403

मुंबई, दि. ९ (पीसीबी) –  निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. परंतु त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर येवल्यामधून शिवसेनेकडून संभाजी पवार यांना उमेदवारी जाहीर केली. परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेसच्याच एका नेत्याने त्यांना धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस माणिकराव शिंदे यांनी संभाजी पवार यांच्याशी हातमिळवणी केली असून आपण शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. छगन भुजबळांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

येवल्यातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे छगन भुजबळ तर शिवसेनेकडून संभाजी पवार हे रिंगणात उतरले आहेत. येवला हा छगन भुजबळांचा मंतदारसंघ आहे. काही दिवसांपूर्वी भुजबळ हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. परंतु आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे सांगत त्यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला होता.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी २१ ऑक्टोबरला मतदान होणार असून २४ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहेत. २००४ पासून येवला मतदारसंघावर छगन भुजबळ यांचंच वर्चस्व आहे. यावेळी जर ते पुन्हा या मतदारसंघातून निवडून आले तर सलग चार वेळा या निवडून येणारे नेते ठरणार आहेत.