कुख्यात गुंड रणजीतसिंह चुंगडेचा तुरूंगात मृत्यू

0
495

अमरावती, दि.१७ (पीसीबी) – अकोल्यातील उद्योजक किशोर खत्री यांच्या हत्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर येथील मध्यवर्ती तुरुंगात असलेला कुख्यात रणजीतसिंह गुलाबसिंह चुंगडे (६६) याचा सोमवारी पहाटे हृदयविकाराने मृत्यू झाला.

सोमवारी पहाटे रणजीतसिंहने छातीत दुखत असल्याची तक्रार तुरुंग कर्मचाऱ्यांक डे केली. त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. कारागृह प्रशासनाने मृत्यूची माहिती त्याच्या कुटुंबीयांना दिली. कायदेशीर बाबींची पूर्तता झाल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात पाठवण्यात येणार असल्याचे कारागृहाचे अधीक्षक रमेश कांबळे यांनी सांगितले.

रणजीतसिंह चुंगडे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख, कामगार सेनेचे माजी जिल्हाप्रमुख, इंटक तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाप्रमुख राहिलेले होते. अमरावती तुरुंगात असताना रणजीतसिंह चुंगडे आणि अकोल्यातील अकोट फैल टोळीयुद्धातील आरोपी सलमान खान यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू होते. या वादामुळे गेल्या काही दिवसांपासून तो तणावात होता, त्यातूनच त्याला हृदयविकाराचा झटका आला असावा, अशी शक्यता आहे.

अकोल्यातील उद्योजक किशोर खत्री यांच्या हत्येप्रकरणी रणजीतसिंह चुंगडे याला अकोला जिल्हा सत्र न्यायालयाने गेल्या वर्षी २७ सप्टेंबरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. ३ नोव्हेंबर २०१५ रोजी खत्री यांची जमिनीच्या वादातून गोळ्या झाडून तसेच धारदार शस्त्रांनी वार करून हत्या केल्याचा आरोप रणजीतसिंह आणि त्यांच्या तीन साथीदारांविरुद्ध होता.

रणजूतसिंह चुंगडे याच्या विरोधात अकोल्यातील पहिले बॉम्बस्फोट प्रकरण, अतिरिक्त पोलीस महासंचालक लक्ष्मीनारायण यांच्यावरील गोळीबार, किशोर खत्री यांच्या हत्या प्रकरणासह ‘टाडा’चा विदर्भातील पहिला गुन्हा आणि इतर अनेक गुन्हे दाखल होते.