मीरा-भाईंदर महापालिकेत शिवसेनेचा राडा; महापौर कार्यालय, स्थायी समिती सभागृहाची तोडफोड

0
326

मुंबई, दि.१७ (पीसीबी) – मीरा-भाईंदर महापालिकेमध्ये शिवसेना व भाजपा नगरसेवकांमध्ये वाद शिगेला गेल्याने राडा झाला. मंगळवारी महापालिकेत स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कला दालनाच्या विषयाचा समावेश न केल्याने शिवसेनेच्या नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतला. दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याने वाद शिगेला गेला. त्यानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांनी भाजपाच्या स्थानिक आमदाराला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत महापौर कार्यालय, स्थायी समिती सभागृहाची तोडफोड केली.

मीरा-भाईंदर महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक मंगळवारी बोलवण्यात आली होती. या बैठकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कला दालन आणि प्रमोद महाजन सभागृहाच्या विषयावर चर्चा करण्यात यावी अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे. आज मंगळवारी (१७ सप्टेंबर) स्थायी समितीच्या बैठकीत या विषयावर चर्चा होणार होती. मात्र, आजही कला दालनाचा विषय नसल्याने शिवसेनेच्या नगरसेवकांनी बैठकीत गोंधळ घालण्यास सुरूवात केली. स्थानिक आमदार नरेंद्र मेहता हे यात आडकाठी आणत असल्याचा आरोप शिवसेने केला. त्यानंतर मेहता यांना शिवीगाळ करत शिवसेना नगरसेवकांनी स्थायी समिती सभागृह, महापौर कार्यालयात तोडफोड केली. जोपर्यंत हा निर्णय होत नाही, तोपर्यंत सभा चालू देणारं नाही, असा पवित्रा शिवसेनेनं घेतला आहे.