काही लोकांनी बेईमानी केल्याने अडीच वर्षे जनतेच्या मनातील सरकार स्थापन झालं नाही

0
158

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर मुंबईत शिवसेनेतील बंडखोरी आणि शिंदे-फडणवीस सरकारची स्थापना यावर भाष्य केलं. यावेळी फडणवीसांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही उल्लेख केला. “काही लोकांनी बेईमानी केली. त्यामुळे अडीच वर्षे जनतेच्या मनातील सरकार स्थापन झालं नाही,” असं मत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलं. ते गुरुवारी (१९ जानेवारी) मुंबईत आयोजित सभेत बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळीकडेच लोकप्रिय आहेत. मात्र, लोकप्रियतेची काही स्पर्धा झाली, तर मोदींच्या लोकप्रियतेत मुंबई पहिल्या क्रमांकावर असेल. इतकं मुंबईकरांचं मोदींवर प्रेम आहे. २०१९ मध्ये मोदींनी मुंबईतच म्हटलं होतं की, पाच वर्षांच्या डबल इंजिन सरकारने महाराष्ट्राला बदललं.तसेच पुन्हा एकदा डबल इंजिन सरकार आणण्याचं आवाहन केलं.”

“मोदींच्या विश्वास ठेऊन महाराष्ट्राच्या जनतेने डबल इंजिन सरकार निवडून दिलं. मात्र, काही लोकांनी बेईमानी केली. त्यामुळे अडीच वर्षे जनतेच्या मनातील सरकार स्थापन झालं नाही. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांचे खरे अनुयायी एकनाथ शिंदेंनी हिंमत केली आणि पंतप्रधान मोदींच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा महाराष्ट्रात जनतेच्या मनातील सरकार स्थापन झालं,” असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. “यानंतर महाराष्ट्र पुन्हा एकदा विकासाच्या दिशेने वेगाने धावू लागला”, असंही फडणवीसांनी नमूद केलं.

“उद्धव ठाकरेंनी गरिबांना पैसे देणारी योजना महाराष्ट्रात लागू केली नाही”
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “आज अनेक उद्घाटनं होणार आहे, त्यात पंतप्रधान स्वनिधी कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. करोना काळात पंतप्रधान मोदींनी टपरीवाल्यापासून हातगाडीवाल्यापर्यंत सर्वांचा विचार करून त्यांच्यासाठी स्वनिधीची निर्मिती केली. मात्र, त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली आणि त्यात गरिबांना पैसे देणारी योजना महाराष्ट्रात लागू न करण्याचा निर्णय घेण्यात आला.”

“मोदींनी ज्या प्रकल्पांचं भूमिपूजन केलं त्याचं उद्घाटनही केलं”
“असं असलं तरी आमचं पुन्हा सरकार आल्यावर आम्ही मुंबईतील एक लाख हातगाडी-टपरीधारकांना स्वनिधीचा लाभ देण्याचा निर्णय घेतला. आज हा आकडा एक लाख १५ हजारपर्यंत पोहचला आहे. मोदी एकमेव पंतप्रधान असतील ज्यांनी ज्या प्रकल्पांचं भूमिपूजन केलं त्याचं उद्घाटनही केलं,” असं फडणवीसांनी सांगितलं.

“आज मेट्रोच्या ७ व २ लाईनच्या ३५ किलोमीटरचं उद्घाटन होत आहे. त्याचं भूमिपूजन मोदींनीच केलं होतं आणि आता उद्घाटनही तेच करत आहेत. ही नवी संस्कृती मोदींमुळे राज्यात आणि देशात निर्माण झाली आहे,” असंही फडणवीसांनी नमूद केलं.