‘काश्मीरचा प्रश्न सोडवला, आसाम-मिझोरामचा का नाही?’

0
339

नवी दिल्ली, दि. ३० (पीसीबी) : आसाम आणि मिझोराममध्ये सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. दोन राज्यांचे पोलीस एकमेकांवर बंदुका रोखून आहेत. रक्तापात सुरू आहे. अराजक निर्माण झालं आहे आणि हे आपल्या देशात घडत आहेत. त्यामुळे कोणती शांतता आणि कोणत्या कायदा सुव्यवस्थेच्या गोष्टी चालल्या आहेत, असा घणाघाती हल्ला संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर चढवला.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा हल्ला चढवला. आपल्याच देशातील एक राज्य दुसऱ्या राज्यात जाऊ नये असं सांगतं. हे आपल्या देशाच्या इतिहासात असं कधी झालं नव्हतं. राष्ट्राराष्ट्रात वाद झाल्यावर अॅडव्हायजरी काढतात. युरोप, अमेरिका आपल्या देशातील नागरिकांना दुसऱ्या देशात जावू नका म्हणून सांगत असते. इथे तर एकाच देशातील एक राज्य दुसऱ्या राज्याला हे सांगत आहे. हे भयावह आहे.

दोन राज्यांचे पोलीस एकमेकांवर बंदूक रोखून उभे आहेत. एकमेकांवर बंदुका चालवत आहेत. रक्तपात होत आहे, हे अराजक आहे. हा सीमावाद असेल की जमिनीचा झगडा असेल. पण हे आपल्या राज्यात होतंय. तेव्हा कोणती शांतता आणि कोणत्या कायदा सुव्यवस्थेच्या गोष्टी चालल्या आहेत, असा संतप्त सवाल राऊत यांनी विचारला आहे.

मिझोराम शांततेशीर राज्य, आसाम हे संवेदशनशील राज्य आहे. त्यामुळे सर्व प्रश्न बाजूला ठेवून केंद्राने हा प्रश्न सोडवला पाहिजे. ही हिंसा म्हणजे हे सरकारचं अपयश आहे. पण हे एका सरकारचं अपयश नाही. स्वातंत्र्यानंतर कोणत्याच सरकारने हा प्रश्न सोडवला नाही. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचा प्रश्न सोडवला. मग हा वाद का सोडवला नाही?, असा सवालही त्यांनी केला आहे.

यावेळी त्यांनी पेगाससवरून सरकारवर टीका केली. विरोधी पक्षाची बैठक सुरू असताना अचानक पियूष गोयल आणि प्रल्हाद जोशी आले होते. त्यांनी विनंती केली काहीतरी मार्ग काढू. संसद चालवू. आम्ही सांगितलं की तुमची जबाबदारी आहे, त्यामुळे तुम्ही उत्तर द्यावं. पेगासस, कृषी कायदे हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. यावर मार्ग काढण्याची सरकारची इच्छा नाही. पेगासस चर्चेवेळी मोदी किंवा शहांनी उपस्थित रहावं ही मागणी मान्य केली नाही. उर्वरित काळात संसद चालावी ही विरोधकांची इच्छा आहे, असंही ते म्हणाले.