काय छापे मारायचे ते मारा…राज्य सरकार पाच वर्षे पूर्ण करणार आणि पुन्हा सत्तेत येणार – शरद पवार

0
361

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – तुम्हाला काय छापे मारायचे ते मारा हे राज्य सरकार आपला पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करेल, इतकेच नाही तर पुन्हा सत्तेत आल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. सीबीआय, ईडी, इन्कमटॅक्स आणि एनसीबी या केंद्र सरकराच्या अखत्यारीत असलेल्या यंत्रणांचा वापर करून महाराष्ट्र सरकार अस्थिर करण्याच्या भाजपाच्या प्रयत्नांवर पवार यांनी पुन्हा एकदा कठोर शब्दांत जोरदार प्रहार केला.

पत्रकार परिषदेत बोलताना पवार म्हणाले, मी ५४ वर्षे संसदेत आहे. वाजपेयी, देवेगौडा, गुजराल अशी अनेक सरकारे मी पाहिली आहेत. त्यांना राज्य सरकारबाबत सहानुभूती असायची. आज जिथे कुठे भाजपेतर सरकार आहे त्यांना वेगळी वागणूक दिली जाते. राज्य सरकार अस्थिर करण्यासाठी सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स, एनसीबी या यंत्रणांचा वापर केला जातो. खरे तर, सीबीआय ला कुठे कारवाई करायची असेल तर राज्याची परवानगी घ्यावी लागते. प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. सीबीआयचा गैरवापर होतो आहे. मुंबईचे पोलिस आयुक्तांनी राज्याच्या गृहमंत्र्यावर आरोप केले, त्यात देशमुख यांच्या सांगणयावरून वसुली होत असल्याचे म्हटले होते. देशमुख यांनी राजीनामा दिला, पण आता ते पोलिस आयुक्त गायब आहेत. केंद्र सरकारला त्याबाबत कळविले पण कोणी दखल घेत नाही असे सांगत पवार यांनी काही उदाहरणे दिली.

ईडी चा वापर करून खासदार भावना गवळी आणि अनिल परब यांच्यासह आणखी काही नेत्यांच्या मागे चौकशिचा ससेमीरा लावला. केवळ दडपण आणण्यासाठी हे सगळे सुरू आहे. एनसीबी (अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरो) चा वापर करून मंत्री नवाब मलिक यांच्याबाबत घडलेला किस्सा सांगताना, जो गुन्हेगार आहे, पुणे पोलिसांनी ज्याच्या नावाचे अटक वॉरंट काढले तोच एनसीबी च्या केसमध्ये त्यांचा पंच असल्याचा आक्षेपार्ह प्रकार समोर आला. अजित पवार यांच्या कुटुंबियांवर इन्कम टॅक्सचे छापे झाले पण त्यातूनही काही निष्पन्न होणार नाही, असेही पवार यांनी स्पष्ठ केले.

ज्यांच्याकडून छापे टाकले जातात त्या यंत्रणांवर आरोप झाले तर त्यांच्या अधिकाऱ्यांनी खुलासे केले पाहिजेत, पण राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि एक माजी खासदारच त्याबाबत बोलत असतात. भाजपाचे नेतेच यंत्रणांचे समर्थन देण्यासाठी पुढे आलेले दिसतात, याचा अर्थ स्पष्ट आहे, असे पवार यांनी निदर्शनास आणून दिले.