याठिकाणच्या नागरिकांनी मला सहा वेळा लोकसभेत पाठवलं

0
337

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) : राज्यात कोरोना प्रतिबंधक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. राज्यात आगामी काळात लवकरच महापालिकेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. या निवडणुका जिंकण्यासाठी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. या रणांगणात खुद्द शरद पवारदेखील उतरल्याचं दिसतंय. पुणे तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका जिंकण्यासाठी पवार यांनी योजना आखायला सुरुवात केली आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्या पुणे येथील बैठका आणि भेटीगाठी वाढल्या आहेत. त्यांनी आज (दि.16 ) बोलताना पुणे तसेच पिंपरी चिंचवड येथील नागरिकांना भावनिक साद घातली. यापूर्वी मी या भागाचे प्रतिनिधित्व केलं होतं. याठिकाणच्या नागरिकांनी मला सहा वेळा लोकसभेत पाठवलं, असं भावनिक वक्तव्य केलं.

शरद पवार आज पिंपरी चिंचवड येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी सुरुवातीलाच पिंपरी चिंचवड तसेच पुण्यावर बोलताना भावनिक भाष्य केलं. “यापूर्वी मी या भागाचे प्रतिनिधित्व केलं होतं. येथील नागरिकांनी मला सहा वेळा लोकसभेत पाठवलं. यापूर्वी या ठिकाणी माझं जास्त जाणं-येणं असायचं पण आता जबाबदाऱ्या बदलल्या आहेत. त्यामुळे येणं-जाणं कमी झालं आहे,” असे भावनिक उद्गार शरद पवार यांनी काढले.

दरम्यान, पुणे महानगपालिकेवर सध्या भाजपची सत्ता आहे. त्यामुळे ही सत्ता उलथवून लावण्यासाठी काँग्रेस, शिवसेना तसेच राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. येथे आमचीच एकहाती सत्ता येणार असा दावा प्रत्येक पक्ष करत आहे. तर प्रत्यक्ष निकालच विरोधकांना उत्तर देईल असे भाजप नेते सांगताना दिसतात. काही दिवसांपूर्वी पुण्याचा महापौर फक्त शिवसेनेचाच होईल असं भाष्य केलं होतं. तर भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी या वक्तव्याचा समाचार घेतला होता. इतर ठिकाणी काय परिस्थिती झाली हे राऊतांना माहिती आहे. राऊत माझ्यापेक्षा मोठा माणूस आहे. पण निवडणुकीनंतर संजय राऊतांना काय ते कळेल, असे गिरिश बापट म्हणाले होते.