काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची ठाकरे, पवार यांच्याशी चर्चा- अशोक चव्हाण

0
396

मुंबई, दि.१५ (पीसीबी)- राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवेसना महाआघाडीचे सरकार लवकरच स्थापन होईल. हे सरकार जनतेच्या हितासाठी काम करणारे असेल, असा विश्वास व्यक्त करून माजी मुख्यमंत्री आमदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा सुरू असल्याची माहिती गुरुवारी येथे दिली.

पत्रकारांशी बोलताना आमदार चव्हाण म्हणाले, की भाजपने मागील १५ दिवसांपासून सरकार स्थापन करण्यासाठी विलंब करून जनतेचे नुकसान केले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेत सत्ता स्थापनेबाबत सकारात्मक चर्चा सुरू असून जनतेला लवकरच एक नवीन सरकार मिळेल, अशी अपेक्षा आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची अजित पवार व उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा सुरू आहे. तीनही पक्षांमध्ये मंत्रिमंडळाचे खातेवाटप यासह अन्य बाबींवर चर्चा केली जात असून विविध बठकादेखील झाल्या आहेत. नवीन सरकार स्थापन करून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करणे गरजेचे असून शेतकरी, बेरोजगारांच्या प्रश्नासह अन्य प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका तीनही पक्षाची असल्याचे त्यांनी या वेळी  स्पष्ट केले. नांदेडला मंत्रिमंडळात स्थान देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील, असेही ते या वेळी म्हणाले.