काँग्रेसमुक्त पिंपरी-चिंचवड केलेल्या अजितदादांना आज त्याच काँग्रेसच्या मदतीची गरज

0
1019

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडमध्ये गेली १५ वर्षे राष्ट्रवादीच्या विरोधात संघर्ष करणाऱ्या काँग्रेसवर आज राष्ट्रवादीचेच काम करण्याची वेळ आली आहे. कधी काळी माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी “औद्योगिकनगरीत औषधालाही काँग्रेसला शिल्लक ठेवणार नाही, अशी भीमगर्जना केली होती. तशी राजकीय स्थितीही त्यांनी निर्माण केली. अजितदादांच्याच कृपेने शहरात शून्य राजकीय अस्तित्व असलेल्या काँग्रेसची आज राष्ट्रवादीला गरज आहे. परंतु, काँग्रेसच्या एकाच गटाला विश्वासात घेत राष्ट्रवादीने लोकसभेसाठी जुळवाजुळव केली असली, तरी काँग्रेसमधील दुसरा गट राष्ट्रवादीवर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

पिंपरी-चिंचवड हा काँग्रेसचा पारंपारिक बालेकिल्ला होता. देशाच्या स्वातंत्र्यापासून या शहरावर काँग्रेसचाच वरचष्मा राहिला. माजी शिक्षणमंत्री प्रा. रामकृष्ण मोरे हयात असेपर्यंत औद्योगिकनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये काँग्रेसचेच राज्य होते. परंतु, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवत शहराच्या राजकारणात प्रवेश केला तेव्हापासून काँग्रेसच्या वर्चस्वाला धक्का लागण्यास सुरूवात झाली. ज्या अजितदादांनी खासदार होण्यासाठी दिवंगत प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या हातापाया पडल्या, त्याच अजितदादांनी खासदार झाल्यानंतर शहरातील काँग्रेसचे गेल्या १५ वर्षांत पूर्णपणे राजकीय खच्चीकरण केले.

दिवंगत प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या निधनानंतर अजितदादांनी शहराच्या राजकारणावर राष्ट्रवादीचे वर्चस्व निर्माण केले. त्यानंतर त्यांनी प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या कट्टर समर्थकांचे एक एक करत राजकीय पंख कायमचे छाटले. अजितदादांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेवर राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता आणल्यानंतर औद्योगिकनगरीत औषधालाही काँग्रेसला शिल्लक ठेवणार नसल्याची भीमगर्जनाच केली. शहरात तशी राजकीय स्थितीही त्यांनी निर्माण केली. पिंपरी-चिंचवडमध्ये अस्तित्वात असलेली काँग्रेस ही राष्ट्रवादीच्या ओंजळीने पाणी पिणारी बनली. काँग्रेसला महापालिकेतील सत्तेचा एखादा तुकडा देऊन अजितदादांनी हा पक्ष कायम आपल्या दावणीला बांधून ठेवला.

राज्यात सत्तेत असताना काँग्रेससोबत राहूनही अजितदादांनी पिंपरी-चिंचवडमध्ये काँग्रेसला संपवण्याचा विडा उचलला होता. त्यामुळेच २०१७ च्या महापालिका निवडणुकीत काँग्रेस शून्यावर बाद झाली. काँग्रेस मुक्त पिंपरी-चिंचवड बनवण्यामध्ये अजितदादांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. आज त्याच काँग्रेसपुढे झोळी पसरण्याची वेळ अजितदादांवर आली आहे. दुसरीकडे शहराच्या राजकारणात गेली १५ वर्षे भाजप आणि शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीसोबतच राजकीय संघर्ष केलेल्या काँग्रेसवरही आज त्याच राष्ट्रवादीचे काम करण्याची वेळ आली आहे.

अजितदादांनी मावळ लोकसभा मतदारसंघात आपले पुत्र पार्थ पवार यांना राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. पुत्राच्या विजयासाठी अजितदादांची धडपड सुरू आहे. त्यासाठी त्यांनी काँग्रेससोबत जुळवून घेण्यासाठी थेट नेत्यांच्या घरांपर्यंत जाऊन गाठीभेटी सुरू केल्या आहेत. परंतु, काँग्रेसमध्ये सुद्धा अनेक गट कार्यरत आहेत. राष्ट्रवादीने केवळ एकाच गटाला विश्वासात घेतल्याने पक्षातील दुसरा गट नाराज आहे. तसेच काँग्रेसच्या नेत्यांचा राष्ट्रवादीकडून योग्य मानसन्मान राखला जात नसल्याचेही पक्ष कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे काँग्रेसमधील एक मोठा गट राष्ट्रवादीपासून अंतर राखून आहे. त्याचे काय परिणाम होणार हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.