काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील भाजपच्या वाटेवर; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

0
596

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज (शुक्रवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. यामुळे राजकीय चर्चांना उधान आले आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून इंदापूर जागेवरून चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट करूनही हर्षवर्धन पाटील दिवसभर नॉट रिचेबल आहेत.  दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात बैठक सुरू आहे. या बैठकीत निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांची यादीवर चर्चा केली जाणार आहे. तसेच मित्र पक्षांसोबत जागावाटप कशाप्रकारे करता येईल यासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे.

यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इंदापूर जागेवरून खुलासा केला. ते म्हणाले, की राष्ट्रवादीच्या यादीमध्ये इंदापूर सोडून सर्व जागांवर चर्चा करण्याचे ठरले आहे. इंदापूरच्या जागेसंदर्भात काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि शरद पवार हे निर्णय घेतील असे ठरले होते. मात्र, त्यापूर्वीच हर्षवर्धन पाटील यांनी मेळावा घेत राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात रोष व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसने या जागेबाबत टोकाची भूमिका घेतलेली नव्हती, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी याबाबत खुलासा केला आहे. हर्षवर्धन पाटील यांनी निर्णय घेण्यास घाई केली असेही पाटील म्हणाले.