वंचित आणि एमआयएममध्ये काडीमोड; स्वतंत्र लढण्याची घोषणा

0
415

औरंगाबाद, दि. ६ (पीसीबी) – वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएममध्ये अखेर फूट पडली असून एमआयएमकडून विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा करण्यात आली आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादमध्ये बोलताना ही घोषणा केली.

यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकरांनी आमचा मान राखला नसल्याची खंत व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीत एमआयएमबरोबर हातमिळवणी केल्यानंतरही मुस्लीम मते वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांना मिळाली नव्हती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएममध्ये काडीमोड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

एमआयएमने वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे ९८ जागांची मागणी केली होती. पुढे त्यात बदल करून किमान ७४ जागा तरी द्याव्यात, अशी विनंती केली होती. पण दोन वेळा चर्चा होऊनही जागांबाबतचे निर्णय होऊ शकला नव्हता.

अॅड. प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांच्यात दोनवेळा बैठका झाल्या, तर खासदार इम्तियाज जलील यांच्याबरोबर तीन बैठका झाल्या. जागा वाटपाचा तिढा न सुटल्यामुळे एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीत काडीमोड होण्याची शक्यता वर्तविली जात होती.

दलित-मुस्लीम ऐक्य घडल्यास राजकीय समीकरणे बदलू शकतात असे सांगत लोकसभा निवडणुकीपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी विशेष सभा घेतली होती. या सभेनंतर एमआयएने कधीही आक्रमक भूमिका घेतली नाही. उलट प्रकाश आंबेडकर हे आमचे नेते आहेत, ते जे सांगतील तसेच होईल, असे एमआयएमचे नेते सांगत होते. मात्र आता स्वतंत्र लढण्याचा निर्णयामुळे राजकीय समीकरण बदलण्याची चिन्हे आहेत.