कर्ज आणि व्यवसायात येत असलेल्या अपयशाच्या नैराश्यातून तरुणाची आत्महत्या

0
452

पिंपरी, दि. 17 (पीसीबी): कर्जाचा डोंगर आणि व्यवसायात सतत येत असलेले अपयश या नैराश्यातून तरुणाने हाताची नस कापून घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि. 16) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास पिंपळे गुरव येथे घडली. दीपक रामचंद्र साबळे (वय 31, रा. जयभवानी नगर, पिंपळे गुरव), असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत दीपक हा सांगवी वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी केतन साबळे यांचा लहान भाऊ होता. मयत दीपक आणि केतन साबळे हे पिंपळे गुरव येथील एका इमारतीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. केतन साबळे त्यांची पत्नी आणि मुलांसोबत राहतात. तर दीपक हा आई वडिलांसोबत वेगळ्या खोलीत राहत होता.

आई वडील बाहेरगावी गेल्यानंतर बुधवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास दीपकने हाताची नस कापून साडीच्या साहाय्याने छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.

दीपकने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. ही चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे. कर्ज आणि व्यवसायात यश येत नसल्याच्या कारणावरून आपण आत्महत्या करत असल्याचे दीपकने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत लिहिले असल्याचे पोलिसांनी सांगितले.