कदाचित भगवान शंकर मला बोलले, की बोलतोस खूप जरा काम पण करुन दाखव – नरेंद्र मोदी

0
856

वाराणसी, दि. ८ (पीसीबी)-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज वाराणसीत बहुप्रतिक्षित काशी विश्वनाथ मंदिर कॉरिडोरचा कोनशिला समारंभ पार पडला. याआधी नरेंद्र मोदींच्या हस्ते काशी विश्वनाथ मंदिरात पूजा-अर्चा करण्यात आली. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल राम नाईकदेखील उपस्थित होते. नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील तीन शहरांच्या दौऱ्यावर आले असून सर्वात आधी त्यांनी वाराणसीमधील काशी विश्वनाथ मंदिरात पूजा-अर्चा केल्यानंतर काशी विश्वनाथ कॉरिडोरचे भुमीपूजन केले. या प्रोजेक्टसाठी ६०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थितांना संबोधित केले. ‘भगवान शंकराची आधी कोणीही चिंता केली नाही. महात्मा गांधींनाही भगवान शंकराच्या या परिस्थितीची चिंता होती. २०१४ च्या निवडणुकीत मी बोललो होतो की मी येथे आलेलो नाही, तर मला बोलावण्यात आले आहे. कदाचित अशा कामांसाठीच मला बोलावण्यात आले होते’, असे यावेळी नरेंद्र मोदींनी म्हटले. कदाचित मला भगवान शंकरानेच सांगितले असावे की, बोलतोस खूप पण जरा इकडे येऊन काम करुन दाखव असेही यावेळी मोदींनी म्हटले.

पुढे त्यांनी सांगितले की, ‘चारही बाजूंनी भिंतींनी घेरलेल्या भगवान शंकराच्या मुक्ततेची ही सुरुवात आहे. यासाठी मी योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या सरकारचे आभार मानतो. त्यांनी यामध्ये खूप सहकार्य केले. जर तीन वर्ष आधी मला तत्कालीन सरकारची साथ मिळाली असती तर आज मी कदाचित उद्घाटन करताना दिसलो असतो’.