मुळशीत बेपत्ता झालेल्या चिमुरडीचा मृतदेह आढळल्याने खळबळ

0
477

पुणे, दि.८ (पीसीबी) – महाशिवरात्रीच्या दिवशी सोमवार (दि.४) आईसोबत निळकंठेश्वर येथे दर्शनासाठी गेलेली ७ वर्षांची चिमुरडी बेपत्ता झाली होती. या चिमुरडीचा मृतदेह गुरुवारी (दि.७ मार्च) मुळशी तालुक्यातील डावजे परिसरात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

श्रुतिकुमारी परशुराम साह (वय ७) असे मृत चिमुरडीचे नाव आहे. याप्रकरणी चिमुरडीच्या कुटुंबाने पौड पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून पोलिसांकडून दिवसरात्र तिचा शोध घेत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रुतीकुमारी ही सोमवार (दि.४) मार्च रोजी महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपल्या आई-बरोबर निळकंठेश्वर मंदीरात दर्शनासाठी गेली असताना आईचा हात सुटून अचानक बेपत्ता झाली होती. बराच वेळ शोध घेऊनही श्रुती न सापडल्याने ती हरवल्याची तक्रार त्याच दिवशी पौड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. पौड पोलीस त्यादिवसापासून श्रुतिकुमारीचा अहोरात्र तपास करत होते. दुर्देवाने गुरुवारी (दि.७) पोलिसांना डावजे परिसरात तिचा मृतदेह आढळला. अज्ञाताकडून श्रुतीची हत्या करण्यात आल्याचा अंदाज आहे. शविच्छेदन आणि पुढील तपासणीसाठी मृतदेह ससून रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. पौड पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.