औरंगाबाद मध्ये कोरोनाचा धोका वाढला ; डबलिंग रेट ४ -५ दिवसांवर आला – प्रशासनाने केला सम विषम फॉरम्युला लागू

0
274

प्रतिनिधी,दि.७ (पीसीबी) : मुंबई, ठाणे, पुणे पाठोपाठ आता महाराष्ट्रातल्या इतर शहरांमध्ये सुद्धा कोरोनाचा धोका वाढू लागला आहे. औरंगाबाद, सोलापूर, नागपूर, मालेगाव अशा ठिकाणी कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काल औरंगाबादमध्ये कोरोनाचे आणखी नवे २८ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे औरंगाबादेत कोरोना बाधितांचा आकडा ३४९ वर पोहोचला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने आता सम विषम फॉरम्युला लागू केला आहे.

लॉकडाऊन १ च्या काळात औरंगाबाद मध्ये कोरोनाचा संसर्ग बऱ्यापैकी आटोक्यात होता. परंतु औरंगाबादेत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रुग्ण वाढत आहे. एका रात्रीत २८ जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा ३४९ वर पोहोचला आहे. गेल्या ६ दिवसात एकट्या औरंगाबादेत १७८ रुग्ण आढळले आहेत. येत्या काही दिवसांत औरंगाबाद मध्ये कोरोनाबाधितांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे औरंगाबाद प्रशासन अतिदक्ष झाले आहे.

औरंगाबादचा कोरोना वाढीचा डबलिंग रेट हा आधी ११ ते १२ दिवसांचा होता. परंतु आता हा डबलिंग रेट ४ -५ दिवसांवर आला आहे. कोरोना बाधित रुग्णांचे कॉन्टाॅक्ट मॅप्पींग करण्यासाठी मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. तसेच बाधित रुग्णांचे टाॅवर लोकेशन घेऊन त्या आधारे सायलंट काॅर्रीअर्सचा शोध गेटला जात आहे. तसेच सोशल डीस्टसिंगची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी रेशन वाटपाची दुकाने विषम तारखांना सुरु ठेवण्यात येतील व किराणा व इतर अत्यावशक वस्तूंच्या विक्रीची दुकाने सम तारखांना सुरु असतील, अशी योजना प्रशासनाने आखली आहे. तसेच सम विषम तारखांना दुकाने सुरु ठेवताना दुकान उघडे ठेवण्याची वेळ दोन तासांने वाढविण्यात आली आहे. सकाळी ११ पासून दुपारी १ वाजेपर्यंत दुकान उघडण्यासाठी मुभा देण्यात आली आहे.